हजारो बेघर भाडोत्री आझाद मैदानात धडकणार; उद्या मोर्चाची हाक, तिरंगा आंदोलन करणार

गेल्या सात वर्षांपासून बेघर भाडोत्री हक्काच्या घरासाठी लढा देत आहेत. परंतु सरकारपर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही. पावसाळी अधिवेशनात फडणवीस सरकारला खडबडून जागे करण्यासाठी येत्या 15 जुलै रोजी बेघर भाडोत्र्यांच्या वतीने मोर्चाची हाक देण्यात आली आहे. आझाद मैदानात तिरंगा आंदोलन करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा-विदर्भ-खान्देश नागरी सेवा संघ ट्रस्टच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

दोन हजार बेघर भाडोत्री कुटुंबाच्या सदस्यांना ठाण्यातील महाराष्ट्र शासनाच्या मोकळ्या जमिनीचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा अशी मागणी आहे. या तिरंगा आंदोलनात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कल्याण, नवी मुंबई येथील बेघर भाडोत्री सहभागी होणार आहेत.

20 एकर मोकळ्या जमिनीची मागणी

नवी मुंबई उलवे येथे तिरुपती बालाजी देवस्थानाला 25 एकर जागा देण्यात आली. या बालाजी देवस्थानाच्या धर्तीवर 20 एकर मोकळी जमीन दुष्काळग्रस्त मराठवाडा-विदर्भ-खान्देश-नागरी सेवा संघ या ट्रस्टला देण्यात यावी अशी संघाची मागणी आहे.

18 वेळा मोर्चा, आंदोलन, तरीही सरकारला जाग नाही

दुष्काळग्रस्त मराठवाडा-विदर्भ-खान्देश नागरी सेवा संघ या सामाजिक ट्रस्टचे अध्यक्ष धनराज थोरात यांच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून बेघर भाडोत्र्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी आझाद मैदान येथे 18 वेळा मोर्चा, आंदोलन करण्यात आले. तसेच मुंबईमध्ये चार वेळा घर हक्क परिषदने सरकारचे लक्ष वेधले असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर नऊ वेळा मोर्चा काढण्यात आले. परंतु कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही, असा आरोप संघटनांनी केला आहे.