
भांडुप पश्चिमेला रिक्षा पकडण्यासाठी रस्ता ओलांडत असताना एका डॉक्टर महिलेला मागून आलेल्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. या अपघातात डॉक्टरच्या कंबरेला फ्रॅक्चर झाले. स्नेहल राठोड (30) या भांडुप पश्चिमेला नंदकुमार जाधव या डॉक्टरांकडे डेन्टेस्ट म्हणून काम करतात. रविवारी त्या नेहमीप्रमाणे क्लिनिकला जाण्यासाठी भांडुपला आल्या. रिक्षा पकडण्यासाठी त्या रस्ता ओलांडत असताना मागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यात स्नेहल यांच्या कंबरेला जबर दुखापत झाली. त्यांच्यावर खारघर येथील एका इस्पितळात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भांडुप पोलिसांत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.