
मराठी माणसामध्ये आत्मसन्मानाचा धगधगता अंगार पेटवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्या 10 जुलै रोजी ‘मातोश्री’वर मानवंदना देण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱया या हृद्य सोहळ्यासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो निष्ठावंत शिवसैनिक गर्दी करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मानवंदनेचा स्वीकार करतील.
शिवसेनाप्रमुखांनी धगधगत्या विचारांनी मराठी माणसाच्या जीवनाचा उद्धार केला. आजही त्यांचे विचार मराठी जन आणि शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करीत असतात. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या नेत्याला वंदन करण्यासाठी शिवसैनिक मोठी गर्दी करतात. या वर्षीदेखील गुरुपौर्णिमेनिमित्त ‘मातोश्री’वर शिवसैनिकांचे जथेच्या जथे दाखल होणार आहेत.
शिवसैनिकांना पर्वणी
शिवसैनिकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘मातोश्री’वर येऊन आपल्या लाडक्या नेत्यासमोर नतमस्तक होण्याची संधी मिळत असल्यामुळे हा सोहळा शिवसैनिकांसाठी पर्वणीच ठरतो. शिवसेनाप्रमुखांची तसबीर आणि त्यांच्या खुर्चीला सुगंधी चाफ्याचा हार, पुष्पगुच्छ अर्पण करून शिवसेनाप्रमुखांना वंदन केले जाईल.
शिवतीर्थावरही नतमस्तक होणार
शिवसेनाप्रमुखांच्या शिवतीर्थावरील स्मृतिस्थळावरही शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना वंदन करतील. गुरुपौर्णिमेनिमित्त स्मृतिस्थळ परिसरात आकर्षक फुलांची सजावटही करण्यात येणार आहे.