मध्य रेल्वेचे वेळापत्रक सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करू, संयमाचा अंत पाहू नका; विविध प्रवासी संघटना आक्रमक

‘रोज मरे, त्याला कोण रडे’ अशी स्थिती मध्य रेल्वेच्या लोकल सेवेची आहे. रोज कित्येक लोकल फेऱया रद्द, तर जवळपास सर्वच गाडय़ा विलंबाने धावतात. याचा लाखो प्रवाशांना त्रास होत असताना रेल्वे प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे विविध प्रवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहू नका, तातडीने उपनगरी रेल्वेचे वेळापत्रक सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकाऱयांना दिला आहे.

गेल्या काही महिन्यांत मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या वेळापत्रकाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या गाडय़ांना प्राधान्य देत आहे. त्या गाडय़ा वेळेवर चालवण्यासाठी लोकल ट्रेन मागे ठेवल्या जातात. लोकल सेवेच्या दररोजच्या विलंबाचा लाखो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाचे संबंधित धोरण अत्यंत निषेधार्ह आहे. लोकल ट्रेनच्या प्रवाशांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप आहे. कल्याण-कसारा -कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे अध्यक्ष राजेश घनघाव, ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेतर्फे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांना लेखी निवेदन दिले आहे.

मेलएक्प्रेससाठी वेगळे ट्रॅक वाढवा

रेल्वे प्रशासनाला महसूलवाढीसाठी मेलएक्प्रेसच्या अतिरिक्त सेवा चालवायच्या असतील तर वेगळे ट्रॅक वाढवावेत, दीर्घकाळ रखडलेला तिसऱया आणि चौथ्या मार्गिकेचा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा. महसूलवाढीसाठी उपनगरी रेल्वेच्या प्रवाशांना दुय्यम स्थान दिल्यास बदलापूर स्थानकात मोठे आंदोलन केले जाईल, असा इशारा प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे.