
मुंबईसह राज्यातील इतर महानगरांमध्ये स्विगी, झोमॅटोसारख्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममार्फत नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणावर अन्नपदार्थ मागवले जात असून या प्लॅटफॉर्मवर दर्शविले जाणारे अनेक क्लाऊड किचन अस्वच्छ असून आरोग्यास धोकादायक अशा परिस्थितीत अन्न तयार करीत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने विधानसभेतील लेखी उत्तरात मान्य केले आहे.
शिवसेना विधिमंडळ पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, आमदार वरुण सरदेसाई व अन्य सदस्यांनी राज्यात फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भात स्वतंत्र नियामक निरीक्षण यंत्रणा स्थापन करण्याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावरील लेखी उत्तरात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी ही माहिती दिली आहे.
अशा अस्वच्छ क्लाऊड किचनमधून अन्न पुरवठा करणाऱया फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोणतीही निरीक्षण व कारवाई यंत्रणा निर्माण केली नाही असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अन्न व औषध प्रशासनाने बृहन्मुंबई व पुणे विभागात जूनमध्ये ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरून अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या एकूण चार क्लाऊड किचनच्या तपासण्या करण्यात आल्या असून अन्न व सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येत असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.