आज दिवाळी खरेदीचा रविवार; रांगोळी, फराळ, कपड्यांच्या खरेदीसाठी मुंबईकर वीकेण्डचा मुहूर्त साधणार

दिवाळी सण जेमतेम आठवडाभरावर आला असून या सणाच्या स्वागतासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. उद्याचा रविवार खरेदीसाठीचा ‘सुपर संडे’ ठरणार असून रांगोळ्या, लायटिंगचे तोरण, पारंपरिक आकाशकंदील, खमंग फराळ, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी दादर, लालबाग, बोरिवली, घाटकोपरसह शहरातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड उडणार आहे.

‘दिवाळी सण मोठा, आनंदाला नाही तोटा’ असे म्हटले जाते. यंदाच्या उत्सवावर महागाईचे सावट असून फराळासाठी लागणाऱ्या तेल, तूप, चणाडाळ, बेसन, साखर अशा सर्वच वस्तूंचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. तरीही या सणाच्या स्वागतात काही कमतरता राहू नये यासाठी प्रत्येकजण खिसा थोडा सैल सोडून खरेदी करणार आहे. दिवाळीनिमित्त लागणाऱ्या विविध वस्तूंनी गेल्या आठवडाभरापासून दादरमधील बाजारपेठा फुलल्या आहेत.

पारंपरिक आकाशकंदील खरेदी करण्यासाठी माहीमच्या कंदील गल्लीत गर्दी होते. अनेक सोसायट्या, कॉर्पोरेट कंपन्या आणि राजकीय पक्षांनीदेखील येथे कंदिलाच्या ऑर्डर दिल्या असून त्या वेळेत पूर्ण करण्यासाठी येथे अहोरात्र लगबग सुरू आहे. दिवाळीनिमित्त मॉलमध्ये कपड्यांवर आकर्षक सूट देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरदेखील आकर्षक एक्स्चेंज ऑफर्स आहेत. झुंबर, लायटिंगचे तोरण खरेदीसाठी लोहार चाळीत तर घराच्या सजावटीसाठी लागणारे पडदे, चादरी, झुंबर, फुलदाणी अशा वस्तूंच्या खरेदीसाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये गर्दी होत आहे.

मेगाब्लॉकमुळे खोळंबा होणार

मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेवर तब्बल 30 तासांचा मेगाब्लॉक आहे. रेल्वे प्रशासनाच्या मेगाब्लॉकमुळे कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली सर्व लोकल बंद राहणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली ते राम मंदिर या स्थानकादरम्यान सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत चार तासांचा जम्बो ब्लॉक असणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच्या वीकेंडला मुंबईकरांचा खोळंबा होणार असून मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

रेडिमेड, डाएट फराळाला पसंती

नवरा-बायको दोघेही जॉबला असल्यामुळे अनेकांना घरी फराळ बनवणे शक्य होत नाही. त्यामुळे रेडिमेड फराळाला मोठी मागणी असून अनेकांनी महिला बचत गटांना महिनाभर आधीच ऑर्डर दिली आहे. डाएट फराळ खरेदी करण्यावरही मुंबईकरांचा भर आहे. अनेकांनी पंधरा दिवस आधीच आपल्या परदेशातील नातेवाईकांना कुरियरने फराळ पाठवले आहे.