
उपनगरी रेल्वेच्या ऑनलाइन तिकीट प्रणालीतील गोंधळाचा मंगळवारी हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे क्यूआर कोड तिकीट बुकिंग बंद केली असतानाच अनेक स्थानकांत एटीव्हीएमचा सर्व्हर बोंबलला. तांत्रिक बिघाडामुळे अनेक एटीव्हीएममध्ये तिकीट काढता आले नाही. त्यानंतर तिकीट खिडक्यांवर रांगेत उभे राहावे लागल्याने प्रवासी तासभर स्थानकांतच रखडले.
रेल्वे स्थानकांतील क्यूआर कोड तिकीट बुकिंग बंद केल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेवर तिकीट गोंधळ वाढला आहे. मंगळवारी सकाळपासून अंधेरी रेल्वे स्थानकात हजारो प्रवाशांना लोकल प्रवास सुरू करण्यापूर्वी तासभर रांगेत उभे राहण्याचा मनस्ताप सहन करावा लागला. पूर्व आणि पश्चिमेकडील दोन्ही तिकीट खिडक्यांवर लांबलचक रांगा लागल्या. क्यूआर कोड तिकीट बुकिंगची सिस्टम बंद केल्याने बहुतांश प्रवाशांनी एटीव्हीएमद्वारे ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी गर्दी केली होती. मात्र एटीव्हीएममध्ये वारंवार तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना अर्धा ते पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर रांगेतून खाली हाताने परतावे लागले. पुन्हा तिकीट खिडक्यांवरील गर्दीचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या गोंधळी कारभाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.
तिकीट खिडक्यांवरील कर्मचारी असंवेदनशील
रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर ‘लंच ब्रेक’ वेगवेगळा असतो. रांगेत अर्धा तास थांबल्यानंतर खिडकीजवळ पोहोचताच ब्रेकची वेळ होते. त्यावेळी तेथील कर्मचारी कुठलाही विचार न करता थेट खिडकी बंद करतात. समोर उभ्या असलेल्या वृद्ध प्रवाशांचाही विचार केला जात नाही. रेल्वेने तिकीट खिडक्यांवरील कर्मचारी ब्रेक घेण्याआधी तेथे लगेच पर्यायी कर्मचारी ठेवावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.
प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये संताप
तिकीट प्रणाली नीट सांभाळता येत नसताना रेल्वे प्रशासन मुंबईकरांना ‘वंदे मेट्रो’च्या आरामदायी प्रवासाचे स्वप्न का दाखवतेय, असा सवाल प्रवासी सचिन खरात यांनी उपस्थित केला. रेल्वे प्रशासन सुविधा पुरवण्यात तोकडे आणि प्रवाशांना वेठीस धरण्यास अग्रेसर आहे, असा संताप कुर्ला येथील अनिकेत पांडे यांनी व्यक्त केला.