
मुंबईमध्ये आता सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण व नियामक मंडळाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता छोट्या मूर्तींचे विसर्जन नदी, तलावांमध्ये करता येणार आहे.
सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात करणे बंधनकारक करण्यात आले होते. गिरगावातील 132 वर्षांची परंपरा असलेल्या केशवजी नाईक चाळ तसेच शास्त्राr हॉल, नवरोजी वकील स्ट्रीट यांच्या पर्यावरणपूरक मूर्ती असूनदेखील कृत्रिम तलावात विसर्जन करावे लागणार होते. ही बाब लक्षात घेत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने प्रदूषण नियामक मंडळाकडे पाठपुरावा केला आणि नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनाची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिल्याची माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली.