मराठीविरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणून अमित शहांनी शिवसेना फोडली; केडियाच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची टीका

महाराष्ट्रात राहून ‘मी मराठी शिकणार नाही’ ही मस्ती एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या राजकारणामुळे वाढली आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

मीरारोड येथील एका अमराठी व्यावसायिकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे या भागातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. मनसेकडून झालेल्या या मारहाणीनंतर, परीसरातील अमराठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करुनच निषेध व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर केडियोनॉमिक्सचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया याने मराठीप्रेमींना डिवचणारे वक्तव्य केले आहे. त्याने एक्सवर एका पोस्टमध्ये राज ठाकरे यांना टॅग करत म्हटले, “मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.” यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत असं म्हणाले आहेत.

केडिया यांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं आहे की, “सुशील केडिया यांची ही टोकाची भूमिका माझ्या लक्षात आली आहे. त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, हे मी पाहिलं. महाराष्ट्रात राहून ‘मी मराठी शिकणार नाही’ ही मस्ती एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या राजकारणामुळे वाढली आहे. ‘जय गुजरात’चा नारा देणाऱ्यांमुळे केडिया यांच्यासारख्या लोकांना बळ मिळत आहे. मराठीविरुद्ध अशी भूमिका घेता यावी, यासाठीच अमित शहा यांनी शिवसेना तोडली आणि फोडली.”

मीरा भाईंदरमधील घटनेनंतर मराठी माणूस पेटून उठला, घेतला मोठा निर्णय