सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण करू नका, अंधेरी विकास समितीतर्फे धरणे आंदोलन

अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालय एका बडय़ा उद्योजकाला देण्याचा घाट घातला जात आहे. परंतु या रुग्णालयाचे खासगीकरण न करता ते मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अंधेरी विकास समितीतर्फे स्थानिकांच्या सहकार्याने गुरुवारी सकाळी सेव्हन हिल्स रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.

सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या जागेचा मूळ मालकीहक्क मुंबई महापालिकेचा आहे. महापालिकेने ही जागा सेव्हन हिल्स रुग्णालयाला लीजवर दिलेली आहे. 17 एकर जागेवर वसलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात 1500 बेड, 36 ऑपरेशन थिएटर, 120 आयसीयूबरोबरच स्टाफ क्वार्टर्स आहे. हे रुग्णालय एखाद्या बडय़ा उद्योजकाच्या ताब्यात गेल्यानंतर ते पंचतारांकित रुग्णालयात रूपांतरित होईल आणि सर्वसामान्यांना तेथे उपचार मिळणे कठीण होईल. यासंदर्भात राज्य सरकार, पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अंधेरी विकास समितीतर्फे अध्यक्ष राजेश शर्मा आणि कार्याध्यक्ष दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले.

 समितीचे पदाधिकारी दिनकर तावडे, माजी नगरसेवक प्रमोद सावंत, सरचिटणीस क्लाईव्ह डायस, अखिलेश सिंह यांनीदेखील हे रुग्णालय मुंबई महानगरपालिकेतर्फे चालविले जावे असा आग्रह व्यक्त केला. मोर्चामध्ये उपाध्यक्ष शांताराम पाटकर, सचिव शिवनाथ खैरनार, जगत गौतम, पृथ्वी मस्के, शैलेंद्र कांबळे, ब्रिजलाल तिवारी, हरीश जोगदंड, गोविंद संबुतवाड, शांताराम पाटकर आदी उपस्थित होते.

मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात

सेव्हन हिल्स रुग्णालय एखाद्या उद्योजकाला दिले तर जास्तीत जास्त 300 ते 400 कोटी रुपये मिळतील. 70 हजार कोटीचे बजेट असणाऱया मुंबई महापालिकेला मानवतेच्या दृष्टिकोनातून हे रुग्णालय चालविण्यास कसलीच अडचण नाही. सध्या असलेल्या सर्व सुविधांचा विचार करता पालिकेने वेळ न दवडता हे रुग्णालय ताब्यात घेऊन मुंबईकरांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे राजेश शर्मा यावेळी म्हणाले.