
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अचानक आणलेल्या ‘पाडू’ या यंत्रावर शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी शिवशक्तीने आक्षेप घेतला आहे. मुंबईतील निवडणुकीत या यंत्राचा वापर केला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यापूर्वीच्या कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या यंत्राचा वापर झालेला नाही, मग केवळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीच हा प्रयोग का केला जात आहे, असा सवालही आयोगाला करण्यात आला आहे.
शिवशक्ती युतीच्या वतीने शिवसेना नेते व सचिव अनिल देसाई आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयुक्तांना यासंदर्भात आज पत्र दिले आहे. त्यात प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट (पाडू) यंत्राला विरोध करण्याची कारणे नमूद करण्यात आली आहेत. पाडू यंत्र मतदान प्रक्रियेत वापरले जाणार याची पुसटशीही कल्पना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिली नव्हती. आयोगाच्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत अनेक बैठका झाल्या. त्या बैठकांमध्येही या यंत्राचा साधा उल्लेखही करण्यात आला नव्हता. निवडणुकीत ऐनवेळी अशी नवीन यंत्रणा आणणे संशयास्पद असून, लोकशाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
राजकीय पक्षांसमोर तपासणीच झाली नाही
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व अन्य यंत्रांची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर तपासणी करून त्यावर त्यांच्या स्वाक्षऱया घ्याव्या लागतात. पाडू यंत्राबाबत असे काहीच करण्यात आले नाही असे पत्रात म्हटले आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मात्र सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना पाडूचे सादरीकरण सर्व राजकीय पक्षांना करण्यात आल्याचा दावा केला होता.
कालबाह्य मतदान यंत्रे का बदलली नाहीत?
पाडू यंत्रे बॅलेट युनिटचा डिस्प्ले बंद पडल्यास मिरर डिस्प्ले म्हणून वापरली जातील असे महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. आयोगाकडे असलेली मतदान यंत्रे जुनी असल्यामुळे व त्यांच्या डिस्प्ले युनिटमध्ये बिघाड होण्याची एक टक्का शक्यता असल्याने बिघाड टाळण्यासाठी हा पर्याय निवडल्याचे सांगण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शिवसेना आणि मनसेने कालबाह्य मतदान यंत्रांबाबत चिंता व्यक्त केली होती. मतदान यंत्रे जुनी आणि अविश्वसनीय असतील तर ती बदलणे अपेक्षित होते. मात्र ’पाडू’सारखे त्रयस्थ यंत्र जोडणे तांत्रिकदृष्टय़ा किती सुरक्षित आहे याची कोणतीही खात्री राजकीय पक्षांना देण्यात आलेली नाही याकडेही पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.
‘पाडू’ म्हणजे नेमके काय?
प्रिटिंग ऑक्झिलियरी डिस्प्ले युनिट (PADU) अर्थात ‘पाडू’ ही मतदान यंत्रातील डेटा वाचणारी आणि तो डेटा प्रिंट स्वरूपात उपलब्ध करून देणारी यंत्रणा आहे. मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला किंवा त्यातून निकाल दिसण्यात अडचण आली, तर ‘पाडू’ यंत्राचा वापर केला जाणार आहे. या यंत्रामुळे तांत्रिक बिघाड होऊनही मतमोजणीची प्रक्रिया थांबत नाही आणि उमेदवारांना लेखी निकाल त्वरित पाहता येतो. केंद्र सरकारच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने ही यंत्रणा विकसित केली आहे.
हेराफेरीची दाट शक्यता
पाडू यंत्राद्वारे मूळ बॅलेट युनिटमधील मतांची संख्या आणि डिस्प्लेवर दिसणारी संख्या यामध्ये तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या यंत्राच्या सीलिंग प्रक्रियेत राजकीय प्रतिनिधींचा सहभाग नसल्याने, यामध्ये काही फेरफार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.



























































