भरधाव कारची दोन पोलिसांना धडक, बंदोबस्तावर असताना अपघात, अंमलदाराचा मृत्यू; महिला पोलीस गंभीर जखमी

वरळी येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या दोघा पोलिसांसोबत विपरीत घडले. एका भरधाव कारने दोघांना धडक दिली. त्यात हवालदार दत्तात्रेय कुंभार (52) यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर महिला पोलीस अंमलदार रिद्धी पाटील या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणात कार चालक रामचंद्र राणे (46) याला त्याच्या ग्रँड आय 10 कारसह ताब्यात घेण्यात आले.

कुंभार व पाटील दोघेही वरळी पोलीस ठाण्यात कार्यरत असून दोघेही आज कोस्टल रोडजवळ बंदोबस्तासाठी तैनात होते. सकाळी पावणे आठच्या सुमारास वरळी-वांद्रे सागरी सेतू आणि कोस्टल रोडच्या कनेक्टरजवळ भरधाव कारने दोघांनाही धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ व्होकार्ड इस्पितळात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना दत्तात्रेय कुंभार यांचा मृत्यू झाला, तर रिद्धी पाटील यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. हा अपघात करणारा आरोपी चालक रामचंद्र राणे याला त्याच्या ग्रँड आय 10 कारसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. चालकाने दारूचे व्यसन केले होते की नाही हे त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर सांगता येईल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. अपघात नेमका कसा झाला ते समजू शकले नाही.