मैत्रीण रुसली म्हणून मुलाने आझमगड गाठले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टाग्रामवर 16 वर्षांच्या मुलाची तीन वर्षांपूर्वी आझमगड येथे राहणाऱया मुलीशी ओळख झाली. दोघांमध्ये दररोज छान गप्पा रंगायच्या, पण अचानक त्यांचे बिनसले आणि मुलीने त्याला ब्लॉक केलं. मैत्रीण रुसली म्हणून त्याने घरच्यांचा विचार न करता तिला भेटायला थेट आझमगड गाठले. पण तिकडे तो भरकटण्याआधीच पंतनगर पोलिसांनी कारवाई करत त्याला सुखरूप मुंबईत आणले.

प्रतीक (नाव बदललेले) हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. मला माफ करा, पुन्हा अशी चूक करणार नाही, मी पुन्हा येईन अशी चिठ्ठी लिहून तो निघून गेला. ही चिठ्ठी वाचून पालकांनी तत्काळ पंतनगर पोलीस ठाणे गाठून मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक लता सुतार यांनी याची गंभीर दखल घेत पथकाला मुलाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. +

पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेतला असता मुलगा एक्स्प्रेसने आझमगडच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पंतनगर पोलिसांनी आझमगड रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून त्या मुलाला ताब्यात घेण्यास सांगितले. त्यानुसार प्रतीक आझमगडला पोहचताच तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मग पोलिसांनी त्याला सुखरूप मुंबईत आणले.

पुढचा अनर्थ टळला

 मुलाची यूपीतल्या आझमगडमध्ये राहणाऱया मुलीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यांचे एकमेकांशी संभाषण होऊ लागले. दरम्यान, अचानक त्यांच्यात बिनसले आणि मुलीने त्याला ब्लॉक केले. यामुळे मुलगा बिथरला आणि त्याने चिठ्ठी लिहून थेट आझमगडचा रस्ता धरला. पण वेळीच पोलिसांनी त्याला तेथे रोखले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.