बेकायदा पार्किंगमुळे गोरेगाव ऑबेरॉय मॉलजवळ वाहतूककोंडी, शिवसेनेची कारवाई करण्याची मागणी

गोरेगाव पूर्व येथील इंटरनॅशनल स्कूलसमोरील मोहन गोखले रोडवर दररोज होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे ऑबेरॉय मॉलजवळ प्रचंड वाहतूककोंडी होत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने बेकायदा पार्किंगवर कारवाई करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

बेकायदा पार्किंगमुळे प्रवाशांची कोंडी होत आहे. शिवाय या ठिकाणी छोटे-मोठे अपघातही होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक रहिवाशांना ये-जा करताना अडथळा निर्माण होतो. शिवाय अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे परिवहन विभागाने याबाबत कार्यवाही करावी, अशी लेखी तक्रार शिवसेना शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक पोलीस उपायुक्त, महापालिका आणि शाळा प्रशासनाकडे केली आहे. या ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावावेत, पोलिसांची गस्त वाढवावी आणि सीसीटीव्हीने नजर ठेवावी, असेही गाढवे यांनी पत्रात म्हटले आहे.