
‘मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हा आवाज उद्या मुंबईच्या आसमंतात घुमणार आहे. हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम येथे होत असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माय मराठीचे हजारो वारकरी वाजतगाजत, गुलाल उधळत, विजय पताका फडकावत मुंबईत दाखल होत आहेत. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार घुमणार असून मराठीच्या भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत असल्याने अवघ्या देशाचे लक्ष या मेळाव्याकडे लागले आहे.
महाराष्ट्रावर ज्या ज्या वेळी संकट आले त्या त्या वेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साद घातली आणि मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला याला इतिहास साक्षी आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडतानाच मराठी माणसामध्ये स्वाभिमानाचा वन्ही चेतवला. आताही महाराष्ट्रावर हिंदी सक्ती करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांविरोधातही मराठी माणसाची वज्रमूठ आवळून ठाकरेच उभे राहिले आणि जिंकले. मराठी माणसाच्या बुलंद आवाजाची पुन्हा एकदा प्रचिती आली. मराठी माणूस एकत्र आल्यामुळेच सरकारला माघार घ्यावी लागली. तो विजयाचा क्षण साजरा करण्यासाठी, महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा आवाज आणखी बुलंद करण्यासाठी आता ठाकरेंनी पुन्हा महाराष्ट्राला उद्याच्या विजयोत्सवासाठी हाक दिली आहे. मराठीचा डंका जगात वाजवायचा तर एकजूट भक्कम हवी, चला मराठी मनाची वीण मजबूत करूया, असे आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केले आहे.
मराठी माणसाच्या या विजयोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या विजयोत्सवात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याने मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवसेना, मनसे आणि समविचारी पक्ष व संघटनांचे नेतेही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. हा विजयोत्सव अभूतपूर्व व्हावा यासाठी शिवसेना आणि मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेला आठवडाभर रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या विजयोत्सवाची होर्डिंग्ज आणि बॅनर्स लागली आहेत.
हक्काने या… आदित्य ठाकरे यांची पोस्ट
हिंदी भाषा सक्तीविरोधात आपण सर्वांनी आवाज उठवला. आपली शक्ती जिंकली, त्यांची सक्ती तोंडावर आपटली, असे नमूद करत आपला हा विजय साजरा करण्यासाठी ‘वाजत गाजत या… जल्लोष करत या… आनंदाने या… हक्काने या’, असे आवाहन शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टमधून केले आहे. आदित्य ठाकरे यांनी आज एनएससीआय डोम येथे जाऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, सुधीर साळवी, उपनेते सचिन अहिर, मनसेचे अभिजित पानसे उपस्थित होते.
आवाज ठाकरेंचा…
मेळाव्याचा आज नवा टिझर आला. त्यात प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचा दरारा दिसत आहे. आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा अशी गर्जना करत चला, हा विजयी क्षण साजरा करूया, असे आवाहन मराठीजनांना करण्यात आले आहे. हा टिझरही तुफान गाजत आहे.
स्थळ – एनएससीआय डोम, वरळी
वेळ – सकाळी 11 वाजता