
‘‘संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडून मुंबई मिळवणाऱया गिरणी कामगारांना धारावीतच घरे द्या आणि अदानीचे टॉवर्स शेलू, वांगणीला पाठवा,’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला आज ठणकावले. गिरणी कामगारांना मुंबईतच हक्काचे घर मिळाले पाहिजे या मागणीसाठी शिवसेना गिरणी कामगारांच्या पाठीशी असल्याचे ठाम आश्वासनही त्यांनी आंदोलकांना दिले.
गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे या प्रमुख मागणीसाठी गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने गिरणी कामगार आणि वारस कुटुंबांनी आज आझाद मैदानात लाँग मार्च काढला. अन्यायग्रस्त हजारो गिरणी कामगारांनी या लढय़ात सहभाग घेत सरकारचा निषेध केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आंदोलक गिरणी कामगारांची भेट घेत मार्गदर्शनही केले. दरम्यान गिरणी कामगारांच्या लाँग मार्चला परवानगी नाकारूनही गिरणी कामगार थेट आझाद मैदानात धडकले. ‘नको वांगणी, नको शेलू… मुंबईतच घरे द्या’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. या वेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते-आमदार व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर, मनसे नेते बाळा नांदगावकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, गिरणी कामगार नेते उदय भट आणि गिरणी कामगारांच्या 14 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पोलीस, सफाई कामगारांनाही घरे द्या!
गिरणी कामगारांची आज दुसरी, तिसरी पिढी आहे. बंद गिरण्यांच्या सोन्यासारख्या जागा गिरणी मालकांच्या घशात घातल्या गेल्या आणि कामगारांच्या उरावर टॉवर उभे केल्याचा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. अदानीला शेलू, वांगणी, देवनार डम्पिंगवर टॉवर बांधू द्या आणि गिरणी कामगारांना धारावी, कुर्ला डेअरीची जागा द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. पोलीस आणि सफाई कामगारांनाही मुंबईत हक्काची जागा द्या, असेही ते म्हणाले.
मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकू
मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आपण एकत्र आलो आहोत. त्यामुळे धीर सोडू नका. हिंमत हरू नका.एकजुटीची वज्रमूठ अशीच ठेवा, शिवसेना तुम्हाला न्याय मिळवून देईल, असे अभिवचनही उद्धव ठाकरे यांनी दिले.
धारावीकरांना मुंबईबाहेर फेकण्याचा डाव
विकासाच्या नावाखाली धारावीकरांना अपात्र ठरवून मुंबईबाहेर काढले जात आहे. आजपर्यंत ज्या धारावीकडे कुणाचे लक्ष नव्हते, ती धारावी अदानीच्या घशात घातली गेली. मुंबईतली 1600 एकर जागा अदानीच्या घशात घातली गेली. मिठागरे, देवनार डम्पिंग ग्राऊंड अदानीच्या घशात घातले, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.
गिरणी कामगारांनी हक्काच्या घरासाठी बुधवारी आझाद मैदानात सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन शिवसेना कामगारांच्या पाठीशी ठाम असल्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते.
मुंबई आणि मराठी माणसासाठीच एकत्र आलो
मुंबई आणि मराठी माणसासाठीच आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले की, प्रबोधनकारांचे आम्ही दोन्ही नातू. माझे आजोबा, वडील बाळासाहेब ठाकरे तसेच माझे काका श्रीकांत ठाकरे हे तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात होते. आमच्या डोळ्यांदेखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतद्रष्टासारखे भांडत बसू का? नाही. म्हणूनच आम्ही भांडणे मिटवून टाकली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.