
भाजप-मिंधेंच्या सत्ताकाळात मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसावर परप्रांतीयांकडून अन्याय वाढले असताना आता चेंबूरमध्ये एका परप्रांतीय विकासकाकडून मराठी कर्मचाऱयाला शिवीगाळ करून जबर मारल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ‘तुम घाटी लोग कभी नही सुधरोगे’ अशा शब्दांत विकासकाने माज दाखवत मराठी कर्मचाऱयाला सुनावले. सुशील रहेजा असे या विकासकाचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदार तरुण चेंबूर येथील डॉ. सी.जी. गिडवानी मार्गावर असलेल्या ‘रहेजा होम्स’ कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहे. मात्र बैठकीप्रसंगी क्षुल्लक चुकीवरून विकासकाने तरुणाला शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. याबाबत मनसेचे गजानन काळे यांनी ‘एक्स’वर याबाबत माहिती जाहीर केली. त्यामुळे मुंबईकर मराठी माणसांकडून बिल्डरच्या मुजोरीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाजपची सत्ता असल्यामुळे परप्रांतीय विकासक रहेजाची डराव डराव वाढली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
या घटना सूचक नाहीत, तर धोक्याची घंटा
- सध्या भाईंदरमध्ये परप्रांतीय उमेदवार महापौर बनला असताना मुंबईमध्ये मुजोरी वाढली आहे. यानंतर आता मुंबई पालिकेत भाजपचा महापौर बसला तर सर्वसामान्यांची काय स्थिती होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- ही घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिली आहे. आशीष शेलार, अमित साटम आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आशीर्वादाने रहेजा तुरुंगात जातो का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- केंद्रात आणि राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. मात्र सरकार महाराष्ट्राला वारंवार दुजाभाव देत असल्याचे प्रकार घडत आहेत. एकीकडे मराठी तरुणांना रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला पळवले जात असताना मराठी माणसाच्या मुंबईतच त्याच्यावर अन्याय होत आहे.
रहेजावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
मुजोर रहेजा विकासकाने जातीवाचक आणि प्रादेशिक अस्मितेवर घाला घालणारी वक्तव्ये केली आहेत. ‘घाटी’ शब्द वापरून संपूर्ण मराठी समाजाला कमी लेखण्याची ही वृत्ती असल्याचे सांगत सामाजिक संघटनांकडून विकासकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे तक्रारीनंतर संबंधित रहेजा बिल्डरवर गोवंडी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
































































