
मुंबईतील घाटकोपरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नाल्यात पडलेल्या मुलीला वाचवायला गेलेल्या तरुणाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. शहजाद शेख असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
घाटकोपरमधील रमाबाई नगर परिसरात रविवारी दुपारी आठ वर्षाची मुलगी नाल्यात पडलेला बॉल घेण्यासाठी नाल्यात गेली आणि अडकली. शेखच्या ही बाब लक्षात येताच त्याने क्षणाचाही विचार न करता नाल्यात उतरुन मुलीला सुखरुप वाचवले. मात्र नाल्यातील गाळ आणि घाणीत तो अडकला.
आसपासच्या लोकांच्या ही बाब लक्षात येताच ते नाल्याजवळ धावले. मात्र शेख गाळात आतमध्ये रुतत गेला. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नाने शेखला बाहेर काढून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे शेखच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.