वरळी पोलीस वसाहतीत घंटागाडी पुन्हा सुरू होणार, युवासेनेच्या पाठपुराव्याला यश

वरळी पोलीस वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरापासून कचऱ्याची घंटागाडी बंद झाल्याने रहिवाशांची गैरसोय होत होती. अखेर युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे वरळी पोलीस वसाहतीमधील बंद झालेली घंटागाडी पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे.

वरळी पोलीस वसाहत येथील शमा क्वार्टस येथे गेले वर्षभर पालिकेची कचरा उचलणारी घंटागाडी बंद होती. त्यामुळे  पदपथावर  कचऱयाचे ढीग साचत होते. रहिवाशांनी ही बाब युवासेनेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख, आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी पालिका जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुल अंडे यांची भेट घेऊन घंटागाडी पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन दिले. त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.