नागपूर जेलचे 9 कैदी गिरवतायत एमबीएचे धडे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश सौंदाळकर। मुंबई

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा झालेले नऊ कैदी हे सध्या ‘एमबीए’च्या तिसऱया वर्षाचा अभ्यासक्रम शिकत आहेत. हिंदुस्थानातील तुरुंगांपैकी सर्वाधिक ‘एमबीए’चा अभ्यासक्रम करणारे कैदी हे नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात आहेत. पाच वर्षांपूर्वी याच तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या चार कैद्यांनी ‘एमबीए’ची पदवी घेतली आहे.

कैद्यांच्या शिक्षणाकरिता नागपूर मध्यवर्ती कारागृहात 2009 पासून अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कैद्यांना शिक्षण दिले जात आहे. 2014 मध्ये जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या सहा कैद्यांपैकी चारजणांनी एमबीएची पदवी घेतली आहे. त्यांच्यात काही कैदी अभ्यासूवृत्ती प्रेरित मुले झाली. 2018 मध्ये 11 कैद्यांनी पुढे येऊन एमबीएचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा दाखवली. त्यापैकी नऊ कैदी हे एमबीएची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले असून ते सध्या एमबीएच्या तिसऱया वर्गात शिक्षण घेत आहेत.

मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बीए, एमच्या पदवी अभ्यासक्रमाचे धडे दिले जातात. यंदाच्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या किरण किशोर गेडाम या महिला कैद्याने एमए (समाजशास्त्र) आणि रहेमतुल्ला अब्दुल खान पठाण या कैद्याने बी.ए.ची (राज्यशास्त्र) पदवी प्राप्त केली आहे. कारागृहातील शिक्षक योगेश पाटील आणि मुक्त विद्यापीठाच्या नागपूर विभागाचे संचालक डॉ. पी. शिव स्वरूप या कैद्यांकरिता कार्यशाळा घेत असतात. तुरुंग प्रशासनाने कैद्यांकरिता ‘शिका आणि शिक्षेत सवलत मिळवा’ हा उपक्रम सुरू केला आहे. दहावी ते बारावी आणि डिप्लोमा केल्यास पाच आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यास आठ दिवस, तर पदवी अभ्यासक्रम पास झाल्यास 15 आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यास 20 दिवस. त्याचसोबत पदव्युत्तर, पदवी, पी. जी., एम. फिल, पी.एच.सोबत डी. संशोधन करून उत्तीर्ण झाल्यास 20 दिवस शिक्षेत सवलत देण्यात येत आहे.

‘ज्ञानवर्धिनी’चा होतोय फायदा

कैद्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्याकरिता तुरुंगात ‘ज्ञानवर्धिनी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत हे कैदी अभ्यासादरम्यान येणाऱया अडचणी लिहून देतात. त्यानंतर दर मंगळवारी दूरध्वनीवरून ‘ज्ञानवर्धिनी’च्या स्टुडिओमध्ये प्रश्न विचारले जातात. त्या स्टुडिओमधून त्या विषयाचे तज्ञ हे कैद्यांना मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करताना हे कैदी तुरुंगात बसून ऐकतात. प्रत्येक बरॅकमध्ये स्पीकर बसवण्यात आले आहेत.
कारागृहातील बंदींना ज्ञानासाठी प्रोत्साहन दिले जाते. ते जेवढे शिकतील तेवढे त्याचे विचार बदलतील. शिक्षण घेणाऱया कैद्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातात. असे उपमहानिरीक्षक, पूर्व विभाग. योगेश देसाई यांनी सांगितले

सिद्धदोष साक्षर कैद्यांचे प्रमाण अधिक

2016-17 मध्ये राज्यात सिद्धदोष कैद्यांपैकी 10 हजार 440 साक्षर आणि 2 हजार 499 हे निरक्षर कैदी आहेत. त्यात 1 हजार 223 हे व्यापारी, 81 सरकारी नोकर, 3 हजार 68 खासगी नोकर आणि 2 हजार 765 हे बेरोजगार असल्याची नोंद आहे, तर 20 ते 30 वयोगटातील 4 हजार 22, 30 ते 40 वयोगटातील 3 हजार 604, तसेच 40 ते 50 मधील 1 हजार 921 आणि 60 पेक्षा अधिक 222 सिद्धदोष कैदी आहेत. सिद्धदोषमध्ये 7 हजार 228 हे विवाहित, 3 हजार 268 हे अविवाहित, 161 विभक्त, 316 हे घटस्फोटित आणि 137 हे विधुर असल्याची नोंद आहे.