1885 शाळांसाठी एकही अर्ज नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱया 25 टक्के कोटा प्रवेशात राज्यातील 1 हजार 885 शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश अर्ज केलेला नाही. त्यामुळे या शाळांमधील तब्बल 14 हजार 263 जागा रिक्त राहणार आहेत.

ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, पालघर, सांगली क सातारा जिह्यातील बहुसंख्य शाळांमध्ये प्रवेश घेण्यास पालक उत्सुक नसल्याचे समोर आले आहे. ज्युनिअर केजी आणि पहिलीच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेकण्यात आल्या आहेत. राज्यात 9195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी 2 लाख 43 हजार 933 पालकांनी अर्ज केले होते. 8 एप्रिलला झालेल्या प्रवेशाच्या पहिल्या सोडतीत 67 हजार 706 जागांची यादी जाहीर झाली. या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 26 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील मराठी, हिंदी, इंग्रजी या माध्यमाच्या 1885 शाळांमध्ये 14 हजार 263 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी एकही प्रवेशअर्ज आलेला नाही. या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून प्रवेश देण्यात येत आहे.

मुंबईतील 356 शाळांमध्ये 25 टक्के प्रवेशाच्या 7 हजार 491 जागा उपलब्ध असून या जागांसाठी 11 हजार 564 प्रवेश अर्ज आले आहेत.

सर्वाधिक शाळा सोलापूरमध्ये

एकही प्रवेश अर्ज न भरलेल्या शाळांची सर्वाधिक संख्या ही सोलापूरमधील आहे. सोलापूरमध्ये 149 शाळांसाठी एकाही विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज केलेला नाही. त्याखालोखाल कोल्हापूर (144), ठाणे (129), पालघर (121), सांगली (118), सातारा (103) या जिह्यांतील शाळांचा समावेश आहे. तर सर्वात कमी अर्ज दाखल झालेल्या शाळांमध्ये भंडारा जिल्हा आघाडीवर आहे. भंडारा जिह्यातील चार शाळांमध्ये ‘आरटीई’अंतर्गत अर्ज भरण्यात आले नाहीत. तर हिंगोली (8), गोंदिया (9), धुळे व वर्धा या जिह्यांमधील प्रत्येकी 10 शाळांकडे पालकांनी पाठ फिरवली आहे.