
सामना प्रतिनिधी। मुंबई
पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नव्या हवेशीर बम्बार्डिअर लोकलच्या फेऱया वाढल्या असताना मध्य रेल्वेचा हार्बर व ट्रान्सहार्बर मार्ग अजूनही नव्या लोकलपासून वंचित राहिला आहे. या मार्गावर जुन्या कोंदट रेट्रोफिटेट लोकलमधून हार्बरच्या प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने उन्हाळ्यात या गाडय़ांमधून प्रवास नकोसा वाटतो. त्यामुळे हार्बर मार्गावरही अधिक मोकळी हवा येणाऱया अत्याधुनिक बम्बार्डिअर लोकल चालविण्याची मागणी होत आहे. परंतु हार्बरच्या मार्गाची क्षमता कमी असल्याने या मार्गावर ताशी 110 कि.मी.च्या वेगाने धावणाऱया बम्बार्डिअर चालविणे अशक्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेला एमयूटीपी योजनेमधून एकूण 72 बम्बार्डिअर लोकल टप्प्याने मिळाल्या आहेत. या लोकल पश्चिम आणि मध्य रेल्वेवर हळूहळू सेवेत आल्या आहेत. तरीही अजूनही हार्बर मार्गावरील प्रवाशांना बम्बार्डिअर लोकलचे दर्शन दुर्लभ झाले आहे. हार्बरच्या प्रवाशांची बम्बार्डिअर गाडय़ांची दुधाची तहान त्यांना सिमेन्सच्या रूपात ताकावर भागवावी लागत आहे. कारण बम्बार्डिअर गाडय़ांचा ताफा जसा ‘परे’ला मिळाला तशा त्यांच्या सिमेन्स गाडय़ा ‘मरे’ला मिळाल्या. आता ‘मरे’वर जशा बम्बार्डिअर गाडय़ा आल्या तशा त्यांच्या जुन्या सिमेन्स हार्बरला मिळाल्या. त्यात ठाणे ते वाशी पनवेल ट्रान्सहार्बरवर तर सगळ्याच गाडय़ा जुन्या रेट्रोफिटेड आहेत.
सिमेन्सलाच प्राधान्य
रेल्वे बोर्डाकडून नव्याने आलेल्या बम्बार्डिअर लोकलच्या मोटरचा वेग ताशी 100 ते 110 कि.मी.इतका जादा आहे. या गाडय़ांना हार्बरच्या ब्रिटिशकालीन एलिवेटेड मार्गावर चालविणे तांत्रिकदृष्टया शक्य नाही. हार्बरच्या मार्गाची क्षमता केवळ ताशी 80 कि.मी. वेगाची आहे. त्यामुळेच सिमेन्स गाडय़ांना बम्बार्डिअरच्या गाडय़ांप्रमाणे कलर करून त्या सध्या हार्बरवर वापरल्या जात आहेत. हार्बरच्या मार्गाची क्षमता अलीकडेच मानखुर्द ते पुढे वाढविण्यात आली आहे. परंतु सीएसएमटीपासून डॉकयार्डपर्यंत नव्या वेगवान बम्बार्डिअर चालविणे शक्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मार्ग लोकल वर्गवारी
मेन लाइन 79 25 बम्बार्डिअर -53 सिमेन्स
हार्बर लाइन 40 30 सिमेन्स -10 रेट्रो
ट्रान्स हार्बर 12 10 एसी रेट्रो -2 रेट्रो
सीवूड-खारकोपर 2 1 सिमेन्स – 1 रेट्रो































































