मतदार यादीत नाव नसलेल्यांना ऑफलाइन सर्च इंजिनने केली मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
1982 साली ईव्हीएमचा सर्वात पहिल्यांदा वापर करण्यात आला. केरळ विधानसभा निवडणुकीत 70 मतदान केंद्रांवर ईव्हीएम वापरण्यात आली.

मतदार यादीत नाव नसल्यामुळे अनेक मतदार पुन्हा माघारी फिरतात. दर निवडणुकीला ही समस्या भेडसावते. परंतु  यावेळी बोरिवली मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर विद्यार्थ्यांनी अनेक मतदारांना त्यांचे नाव शोधण्यासाठी मदत केली. जागोजागी लॅपटॉप घेऊन बसलेले विद्यार्थी दिसले. या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन सर्च इंजिनच्या मदतीने मतदारांचे नाव एका क्लिकवर शोधले. बोरिवलीचे उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांमध्ये नाव नसलेल्या मतदारांची नावे शोधण्यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात आले असून त्याचा उपयोग यावेळी मतदानासाठी झाला.

या सुविधेमुळे अंध, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी मतदारांना या सुविधेचा प्रचंड फायदा झाला. अनेकांची नावे मतदार यादीत नव्हती. अशा वेळी विद्यार्थ्यांनी एका क्लिकवर या मतदारांना त्यांचे नाव शोधून दिले.

पुस्तकात नाव शोधण्याची प्रक्रिया वेळखाऊ 

मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाकडून प्रत्येक वेळी हेल्प डेस्कची सुविधा उपलब्ध असते. त्यांच्याकडे सर्व याद्या पुस्तक स्वरूपात असून ज्या मतदाराचे नाव गहाळ आहे त्यांचे नाव त्या यादीत शोधले जाते, परंतु या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. त्यामुळे उपाय म्हणून निवडणूक आयोगाने सर्च इंजिन नावाचे सॉफ्टवेअर डेव्हलप केले असून बोरिवलीतील मतदान केंद्रांवर त्याचा वापर करण्यात आला.

सॉफ्टवेअर वापरण्याबाबत घेतल्या कार्यशाळा 

प्रत्येक मतदान केंद्रावर ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी निर्मला फाऊंडेशनच्या वतीने बीएसस्सी आयटीच्या 100 विद्यार्थ्यांना याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. याबाबत कार्यशाळा घेण्यात आल्या. दरम्यान, अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्याने सर्च इंजिनवर नाव शोधताना अडचण येऊ शकते. यासाठी हे सर्च इंजिन ऑफलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. बोरिवली, मनोरी अशा मतदारसंघांत या विद्यार्थ्यांनी बीएलओ अधिकाऱयांच्या हाताखाली मतदारांना या उपक्रमातून मदत केली.