मुंबईत यंदा फक्त 35 तळीराम सापडले, आतापर्यंतच्या ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह कारवाईचा सर्वात कमी आकडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकट टळलेले नसल्याने सर्वांनी घरी राहूनच नववर्षाचे स्वागत करावे या पोलिसांच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. इतर वर्षांच्या तुलनेत यंदाच्या थर्टी फर्स्ट नाइटला तुरळक लोक रस्त्यावर दिसले. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही तसेच फक्त 35 तळीराम पोलिसांच्या जाळय़ात सापडले. थर्टी फर्स्ट नाइटला आतापर्यंत झालेल्या ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह कारवाईचा हा सर्वात कमी आकडा ठरला आहे.

थर्टी फर्स्ट नाइटला मुंबई पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवला होता. ठिकठिकाणी नाकाबंदी ठेवून पेट्रोलिंगवर भर दिला होता. रात्री 11 नंतर पोलीस नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे थर्टी फर्स्ट नाइटसाठी हॉटस्पॉट असणाऱया गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी सीफेस, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड येथे 11 नंतर सन्नाटा होता. तसेच हॉटेल व अन्य आस्थापना बंद असल्याने नागरिकांची वर्दळ नव्हती.

नागरिकांनी घरातच नववर्षाचे स्वागत करणे पसंत केले. त्यामुळे शहरात कुठेही तळीरामांचा धुमाकूळ किंवा अन्य अनुचित प्रकार घडला नाही. केवळ 35 अतिउत्साही तळीराम पोलिसांना ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह कारवाईमध्ये सापडले. त्यात 26 दुचाकी चालक, आठ चारचाकी तर एका रिक्षाचालकाचा समावेश आहे. गेल्या वर्षी 677 तळीराम ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह केसमध्ये सापडले होते.