पूर्व-पश्चिम उपनगराला जोडणारा आणखी एक मार्ग खुला! मिठी नदीजवळील ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी नवा पूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा आणखी एक मार्ग आजपासून खुला झाला आहे. पवई मिठी नदीजवळील ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी महापालिकेने नव्याने बांधलेल्या पुलामुळे वाहतुकीसाठी मोठी सोय निर्माण झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये पाडलेल्या या पुलाच्या जागी पालिकेने केवळ पाच महिन्यांत काम पूर्ण केले. हा पूल 34 मीटर लांब आणि 24 मीटर रुंद आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी ही माहिती दिली.

पालिकेच्या ‘एस’ विभागातील फिल्टरपाडा परिसरातून जाणारा साकी विहार मार्ग आहे. या मार्गाने पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी परिसरात जाता येते. याच मार्गावर असणाऱया मिठी नदीवर 1940 मध्ये 20 मीटर लांब व 7 मीटर रुंद असणारा पूल बांधण्यात आला. मात्र धोकादायक झाल्याने गेल्या वर्षी हा पूल पाडण्यात आला. हा पूल बांधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने काम करण्यात आले. विशेष म्हणजे या ठिकाणी काम करणाऱया अनेक कर्मचारी-अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र पालिकेने या आव्हानांचा सामना करीत दिवसरात्र काम करून विक्रमी वेळेत पुलाचे काम पूर्ण करण्यात आल्याचे प्रमुख अभियंता (पूल) राजेंद्रकुमार तळकर यांनी सांगितले. या ठिकाणी वाहतूकदार, रहिवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्पुरता भराव टाकून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता.

पुलाची रुंदी-उंची वाढल्याने सुविधा

 या ठिकाणच्या जुन्या ब्रिटिशकालीन पुलाची रुंदी केवळ 7 मीटर इतकी होती, मात्र आता पालिकेने बांधलेल्या पुलाची लांबी 24 मीटर इतकी आहे. म्हणजेच नवीन पूल जुन्या पुलाच्या तुलनेत तिपटीपेक्षा जास्त रुंद आहे. पुलाच्या दोन्ही मार्गिकांच्या बाजूंना संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे.
 जुना पूल 6 मीटर उंच होता, मात्र नव्याने बांधलेला पुलाची उंची 7 मीटर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला पादचाऱयांसाठी 1.2 मीटर रुंदीचे फुटपाथ ठेवण्यात आले आहेत. पुलाच्या मध्यभागी सुमारे 2 मीटर रुंदीची जागा जल वाहिन्या व अन्य संभाव्य कामांसाठी सोडण्यात आली आहे.