
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायत व ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीने परजिल्ह्यातून गावात येणार्या नागरीकांसाठी खास नियमावली बनवली आहे. यात गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी व परजिल्ह्यातून येणार्यांनी 7 ऑगस्टपूर्वी येऊन होम क्वारंटाइन राहावे. डिगस गाव कोरोनामुक्त झाला आहे, त्यामुळे 7 ऑगस्टनंतर येणार्या मुंबईकरांना 1 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय या ग्रामपंचायतीने घेतला आहे.
सिंधुदुर्गात 7 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्रीनंतर चाकरमान्यांना प्रवेशबंदीबाबत जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायती कडून एकामागे एक निर्णय घेतले जात आहेत.
परजिल्ह्यातून येणार्या व्यक्तींनी 7 ऑगस्ट 2020 पूर्वी गावात येऊन 14 दिवस होम क्वारंटाईन राहणे बंधनकारक आहे. 7 ऑगस्टपूर्वी 4 दिवस अगोदर डिगस ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष येऊन येणार्या व्यक्तींची संपूर्ण माहिती द्यावी. 7 ऑगस्टनंतर येणार्यांना 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. तसेच सदर व्यक्तींना होम क्वारंटाइन करून ठेवले जाईल. मास्क न वापरता फिरताना आढळल्यास 200 दंड तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, पान खाऊन थुंकल्यास 500 रुपये दंड. परगावातील भजनी मंडळांना गावामध्ये येण्यास मनाई आहे. तसे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची नियमावली बनवण्यात आली आहे.
गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामपंचायत व नियंत्रण समितीने ही नियमावली केली आहे. जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतेही आदेश जाहीर केलेले नाहीत. जिल्हा प्रशासनाने क्वारंटाइनबाबत आदेश जाहीर केल्यास सुधारित नियम जाहीर करण्यात येईल. उशिरा येणार्या चाकरमान्यांसाठी आकारण्यात येणारा दंड हा केवळ शिस्तीसाठीच आहे. – अमर घाडी, उपसरपंच, डिगस

























































