
अँटिबायोटिक्स अर्थात प्रतिजैविके ही जीवरक्षक मानली जातात. प्रत्येक आजार आणि विकारांवर वेगवेगळी औषधं असतात आणि त्यांची परिणामकारकता ही देखील वेगळी असते. म्हणूनच ती नेहमी तपासून घ्यावी लागतात. जर चुकीची औषधं घेतली तर परिस्थिती गंभीर बनू शकते. असाच काहीसा प्रकार परळ येथील एका तरुणासोबत घडला आहे.
समान प्रकारचं औषध आहे, असं सांगून चुकीचं औषध दिल्याने एका तरुणाच्या वडिलांना रुग्णालयात दाखल व्हायची पाळी आली आहे. निनाद डोईफोडे असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचे आई-वडील नैराश्यात असून त्यावर मानसोपचार घेत आहेत. या मानसोपचाराचा भाग म्हणून त्यांना मिर्टाझ 7.5 एमजी ही गोळी देण्यात येत होती.
18 फेब्रुवारी रोजी डोईफोडे यांच्या वडिलांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्यावरील उपचारांचे तपशील मागवले. त्यात डोईफोडे यांचे वडील मेथोट्रेक्सेट 7.5 एमजी ही गोळी घेत असल्याचं दिसून आलं. ही गोळी कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारांमध्ये केमोथेरपीसाठी वापरली जाते. हे औषध डोईफोडे यांच्या आईने भारती जनरिक मेडिकल स्टोअरमधून आणलं होतं. वास्तविक त्यांची मूळ गोळी मार्टिझ असताना केमिस्टने समान गुणधर्माचं औषध असल्याचं सांगून मेथोट्रेक्सेटची गोळी दिली होती. ती घेतल्याने डोईफोडे यांच्या वडिलांची तब्येत बिघडली.
डोईफोडे यांनी सदर केमिस्टविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या केमिस्ट दुकानाचा मालक मंग्या वसावे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
























































