मुंबईत पोलिसांची आता घोड्यांवरून गस्त, माऊंटेड कॉप्स नवीन पथकांची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

लंडन, न्यूयॉर्क, मॉस्को तसेच देशातील कोलकाता, म्हैसूर पोलिसांच्या धर्तीवर मुंबई पोलीस आता उमद्या घोड्यांवरून गस्त घालताना दिसतील. मुंबई पोलीस दलात 30 घोड्यांचा समावेश असलेले ‘माऊंटेड कॉप्स’ हे नवीन पथक स्थापन करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. गस्त घालण्याबरोबर जमावाला पांगवणे अशी जबाबदारी या अश्वारूढ पोलिसांवर सोपवण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी 99 लाख 30 हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश पोलिसांचे पथक घोड्यांवरून गस्त घालत होते. स्वातंत्र्यानंतर पोलीस दलातील घोडेस्वारांचे पथक अस्तंगत झाले, पण देशात चेन्नई, म्हैसूर व कोलकात्यामध्ये अजूनही घोडेस्वारांचे पथक अस्तित्वात आहे. न्यूयॉर्क, लंडन, मॉस्कोमध्ये आजही पोलीस घोड्यांवरून गस्त घालताना दिसतात. त्याच धर्तीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस दलात 30 घोड्यांचा समावेश असलेले ‘माऊंटेड कॉप्स’ हे नवीन पथक स्थापन करण्यात येणार आहे. पथकासाठी 30 उमद्या घोड्यांची खरेदी करण्यात येईल. घोड्यांसाठी पागा व त्यांची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र डॉक्टरांची व्यवस्था करण्यात येईल. तगड्या घोड्यांची खरेदी व इतर खर्चासाठी 1 कोटी 99 लाख 30 हजार 588 रुपयांची आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय राज्याच्या गृह विभागाने आज प्रसिद्ध केला आहे.

नव्याने स्थापन केलेल्या या पथकात नायगावाच्या सशस्त्र पोलीस दलातील एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, चार पोलीस हवालदार, 32 पोलीस शिपाई तैनात करण्यात येतील. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जलद प्रतिसाद पथक (क्विक रिस्पॉन्स टीम)च्या अधिपत्याखाली ‘माऊंडेट कॉप्स’ हे पथक काम करणार आहे. या पथकात नियुक्ती होणार्‍या पोलिसांना घोडेस्वारीचे खास प्रशिक्षण देण्यात येईल. घोडेस्वारांच्या या पथकाचा प्रयोग यशस्वी झाल्यास मुंबई पोलीस दलात घोडेस्वारांच्या पथकाची संख्या वाढवण्याची योजना आहे.