मुंबई पोलीस 45 दिवस राजस्थानच्या जंगलात, थर्मलड्रोनच्या मदतीने आरोपींना अटक; 6 कोटींचे दागिने हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली (प.) येथील जवाहिऱ्याच्या दुकानातून 7 कोटी रुपये किमतीचे सोने, चांदी व डायमंड अशा दागिन्यांची चोरी करून राजस्थानच्या जंगलात लपलेल्या 4 आरोपींना एमएचबी पोलिसांनी 45 दिवस पाळत ठेवून अटक केली व 6 कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत केला. मुंबईचे पोलीस देवेन भारती यांनी एमएचबी पोलिसांचे कौतुक केले आहे.

14 जानेवारी 2026 रोजी होलीक्रॉस रोड आयसी कॉलनी येथील माय गोल्ड पॉइंट या ज्वेलर्सच्या दुकानातील तिजोरीतून 6 कोटी 79 लाख 85 हजार रुपये किंमतीचे दागिने रात्रीच्या वेळेस दुकानाचे सेल्समन प्रभू गोप सिंग दसाणा व नारायण सिंग मोहन सिंग यांनी चोरून नेले. दुसऱ्या दिवशी तिजोरी फोडल्याचे लक्षात येताच माय गोल्ड ज्वेलर्सच्या मालकाने एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश गवळी यांच्याकडे तक्रार केली. गवळी यांनी ताबडतोब अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, उपायुक्त संदीप जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड, मंगेश किरपेकर, निलेश पाटील, संदीप गोरडे, वसीम शेख, संतोष भोसले या अधिकाऱ्यांचे एक पथक नेमले. या अधिकाऱ्यांनी तांत्रिक तसेच खबऱ्यांच्या मदतीने तपास सुरू केला असता आरोपी राजस्थानला मुद्देमालासह पळाल्याचे आढळून आले.

हरीश गवळी यांचे पथक राजस्थानला रवाना झाले; परंतु दिलेल्या पत्त्यावर ते सापडले नाहीत. राजसमंद जिल्हय़ातील कुवारीया जंगलात 2 नव्हे, तर त्यांचे आणखी 4 साथीदार लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अशावेळी पोलिसांनी गर्द अंधाऱ्या जंगलात लपलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रोनची मदत घेतली. थर्मल ड्रोनचा वापर यशस्वी ठरला. जंगलात लपलेले चार आरोपी 45 दिवसांनी पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून 6 कोटींचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी खरात, बबलू साळुंखे, संदीप परीट, तिरुपती रेकुळवाड, सतीश देवकर, अर्जुन आहेर, गणेश शेरमाळे, सचिन मंजुळे, सिद्धेश पाटील, योगेश मोरे, सुनील मस्के, आदित्य राणे यांनी भाग घेतला.