पालिका सभागृहात ‘खड्डा’जंगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील सर्व खड्डे ४८ तासांत बुजवणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी पालिका सभागृहात जाहीर केले. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांवरून आज पालिका सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली. शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी शिवसेनेने ४८ तासांत खड्डे बुजवण्याची मागणी केली. यानंतर येत्या ४८ तासांत सर्व खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले.

मुंबईत गेल्या काही दिवसांत पडणाऱया जोरदार पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. याबाबत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिकेच्या महासभेत निवेदन करून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच रस्त्यांची वाताहत झाल्याचे सांगितले. यावेळी कंत्राटदारांचा निष्काळजीपणा शिवसेनेने उघड केला. चुकीच्या पद्धतीनेच रस्त्याची कामे होत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे निर्माण होत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे मुंबईकरांच्या जीविताचा प्रश्न असल्यामुळे ४८ तासांत खड्डे बुजवा अशी मागणीही जाधव यांनी केली. पालिकेत येणारे नवनवे आयुक्त हे मुंबईची ‘प्रयोगशाळा’ करून मनमानीप्रमाणे उपक्रम राबवत असल्याचे सभागृह नेत्या विशाखा राऊत म्हणाल्या. त्यामुळे खड्डय़ांना जबाबदार असणाऱया कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली.

…तर कंत्राटदार काळ्या यादीत

खड्डे भरताना कंत्राटदार खड्डय़ांमध्ये पालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले कोल्डमिक्स न वापरता विटा, डेब्रिज, तुटलेल्या टाईल्स टाकत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी असे आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून एफआयआर दाखल करण्यात येईल असे सांगितले.

आज तातडीची बैठक

तब्बल साडेतीन तास चाललेल्या चर्चेत ३५ हून अधिक सदस्यांनी कंत्राटदारांचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर हल्लाबोल केला. यावेळी नगरसेवकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन प्रशासन काय उपाययोजना करणार ते ताबडतोब जाहीर करावे, असे आदेश महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्तांना दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी उद्या १३ जुलै रोजी ११.३० वाजता रस्त्यांचे कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावली असल्याचे जाहीर केले.