मुंबई वीज खंडित; सखोल चौकशी करा, अशी घटना पुन्हा घडता कामा नये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर परिसरात सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण मुंबईच ठप्प झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत तत्काळ संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक घेतली. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून वस्तुस्थितीची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभाग, प्रशासन आणि वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अशी घटना पुन्हा घडता कामा नये. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची तातडीने चौकशी करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले.

वीज पुरवठ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापारेषण अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे तसेच बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांच्या अधिकाऱयांना तत्काळ बोलावण्यात आले. ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.

यंत्रणेत सुधारणा करा!

अशा घटना सलग क्रमाने घडण्याची शक्यता संभवत नसली तरीदेखील आज ही घटना घडल्यामुळे या पुढील काळात अधिक सावधानता बाळगावी लागेल. तेव्हा यंत्रणेत आवश्यकता भासल्यास अधिक सुधारणा करा, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

अडीच तासांत वीजपुरवठा पूर्ववत

मुंबईत 10 वाजण्याच्या सुमारास विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात माहिती घेऊन. हा बिघाड तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. यामुळे संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल असा अंदाज वर्तवला जात असतानाच अवघ्या अडीच ते तीन तासात वीज पुरवठा पूर्ववत होण्यास सुरुवात झाली. वर्षावरील बैठकीदरम्यान रुग्णालये आणि रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्यात आला अशी माहिती ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमपुमार गुप्ता यांनी दिली.

कुठे गाफीलपणा झाला?

हा बिघाड अनपेक्षित होता की अपेक्षित होता? यात काही गाफीलपणा झाला आहे का, असा सवालच मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱयांना केला. ज्या कारणांमुळे ही घटना घडली त्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यास त्यांनी सांगितले. येणाऱया चार दिवसांत मुसळधार परतीच्या पावसाचा अंदाज असून या दृष्टीनेही विजेच्या मागणीचा विचार करुन सतर्प राहा, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.