
मुंबईतील कबड्डीची खरी ताकद मानल्या जाणाऱ्या स्थानिक मंडळांच्या खेळाचे दर्शन आता प्रभादेवीत घडणार आहे. येथील प्रसिद्ध स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ‘राजाभाऊ देसाई स्मृतीचषक’ निमंत्रित स्थानिक पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला सोमवार, 9 मार्चपासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. टी-20 वर्ल्ड कपचा थरार संपल्यानंतर आता सलग पाच दिवस चवन्नी गल्लीतील क्रीडानगरीत कबड्डीचा चढाई-पकडींचा रोमहर्षक खेळ रंगणार आहे.
गेल्या 83 वर्षांपासून कबड्डी आणि खेळाडूंना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदाच्या स्पर्धेसाठी प्रो-कबड्डीच्या धर्तीवर भव्य आयोजन केले आहे. या स्पर्धेला इंडियन ऑइल, एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या नामवंत संस्थांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे. मंडळाचे प्रमुख कार्यवाह आणि आमदार महेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजवर व्यावसायिक संघांना संधी देणाऱ्या या मंडळाने यंदा मुंबई शहरासह उपनगर, पुणे, नांदेड, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील 18 बलाढ्य स्थानिक संघांना निमंत्रित केले आहे. मॅटवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 30 हून अधिक प्रो-कबड्डी सुपरस्टार्समुळे प्रेक्षकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. यामध्ये पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, संकेत सावंत, आकाश शिंदे आणि अजित चव्हाण यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
विजेत्या संघांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने भरघोस बक्षिसे जाहीर केली आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघाला1 लाख 83 रुपयांचे रोख इनाम देऊन ‘लक्षाधीश’ करण्यात येणार आहे, तर उपविजेत्या संघाला 75 हजार रुपये आणि चषक प्रदान केला जाईल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या संघांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा प्रमुख संतोष सावंत यांनी दिली. याशिवाय सर्वोत्तम खेळाडू, उत्कृष्ट चढाई आणि पकड करणाऱ्या खेळाडूंनाही स्वतंत्र रोख पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.
राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेत सहभागी संघ
अ गट : सतेज संघ बाणेर (पुणे), अमर क्रीडा मंडळ (मुंबई शहर), गोल्फादेवी सेवा मंडळ (मुंबई शहर.
ब गट : विजय नवनाथ मंडळ (मुंबई शहर), विजय क्लब (मुंबई शहर), एसएसजी फाऊंडेशन (मुंबई शहर)
क गट : सिद्धीप्रभा फाऊंडेशन (मुंबई शहर), ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब आडगाव (नाशिक), अंकूर स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर)
ड गट : वाघजाई क्रीडा मंडळ (रत्नागिरी), विजय भारत क्रीडा मंडळ (मुंबई शहर), शिवनेरी सेवा मंडळ (मुंबई शहर)
इ गट : स्वस्तिक क्रीडा मंडळ (उपनगर), मिडलाईन अॅकॅडमी (नांदेड), नवोदित संघ (मुंबई शहर)
फ गट : गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर), भैरवनाथ क्रीडा मंडळ (पुणे), लायन्स स्पोर्ट्स क्लब (मुंबई शहर)


























































