
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर रिअल इस्टेट क्षेत्राची घडी चांगलीच पूर्वपदावर आली आहे. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मुंबईतील मालमत्ता नोंदणी 7 हजारांपर्यंत मजल मारून 10 वर्षांतील विक्रम रचण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने आपल्या अहवालात हा अंदाज वर्तवला आहे. गेल्या 21 दिवसांत 6 हजारांहून अधिक मालमत्तांची नोंदणी झाली आहे.
कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला. परंतु लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर इतर क्षेत्रांप्रमाणेच रिअल इस्टेटने उसळी घेतली आहे.
2018च्या सप्टेंबर महिन्यात मुंबई शहरात एकूण 5913 मालमत्तांची नोंदणी झाली होती. हा आकडा यंदाच्या सप्टेंबरमध्ये 21 दिवसांतच मागे पडला आहे. पितृपक्ष सुरू झाल्यानंतर नोंदणीचा टक्का थोडाफार कमी होईल. मात्र प्रत्येक दिवसाला जरी 50 ते 100 मालमत्तांची नोंदणी गृहित धरली तरी शहरातील महिनाभरातील मालमत्ता नोंदणी 7 हजारांच्या पुढे जाऊ शकणार आहे. हा आकडा मागील दहा वर्षांतील नवा विक्रम ठरेल, असे मोतीलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अहवालात म्हटले आहे.
ऑगस्ट महिन्यात दरदिवशी 225 मालमत्तांची नोंदणी झाली होती. सप्टेंबरमध्ये हा आकडा चांगलाच वाढला आणि प्रत्येक दिवशी 300 युनिट्सची नोंदणी होऊ लागली. कुठलीही कर कपात किंवा स्टॅम्प डय़ुटीमध्ये सूट न मिळताही मालमत्ता नोंदणीचा हा आकडा वाढताच राहिला आहे.
मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड, ओबेरॉय रिऍल्टी लिमिटेड आणि सनटेक रिऍल्टी लिमिटेड या कंपन्या आघाडीवर राहिल्या आहेत.




























































