
मुंबई- पुणे एक्प्रेस वेवर चार वाहनांच्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमधील चार जण एकाच कुटुंबातील आहेत.
सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमाराला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर खालापूर टोलनाक्यानजीक हा अपघात झाला. इथून जाणाऱ्या कंटनेरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला. त्यामुळे कंटेनरने पुढे धावणाऱ्या एका टेम्पोला मागून धडक दिली. टेम्पो पलटी झाला आणि त्याच्या मागून येणाऱ्या या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा आणखी एक टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता वाढली. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला.
हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. अपघात झालेल्या दोन्ही कारमधील कुटुंबीय पुण्याला एका कार्यक्रमाला एकत्र गेले होते. तिथून परतत असताना हा अपघात झाला.
या अपघातात मृत्युमुखी पडलेले डॉ. वैभव झुंजारे हे नवी मुंबई महापालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी होते. ते त्यांच्या खासगी कारने नवी मुंबईकडे येत होते. कोरोना काळात त्यांच्यावरही कोरोना नियंत्रणाची जबाबदारी असल्याने त्यांनी खबरदारी म्हणून त्यांनी आई, वडील, पत्नी व मुलांना गावी ठेवले होते. सोमवारी रात्री या सर्वांना घेऊन ते परत येत असताना हा अपघात घडला. या अपघातात डॉ. झुंजारे स्वत: त्यांची पत्नी, आई आणि मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातातील मृतांची नावे पुढील प्रमाणे आहेत – मंजू प्रकाश नायर (58 , रा. गोरेगाव मुंबई), डॉ. वैभव वसंत झुंजारे (41 , रा. नेरुळ नवी मुंबई), उषा वसंत झुंजारे (63 , रा . नेरुळ नवी मुंबई), वैशाली वैभव झुंजारे (38 रा. नवी मुंबई), श्रिया वैभव झुंजारे (5, रा. नेरुळ नवी मुंबई)
अपघातातील जखमींचे नावे –
स्वप्नील कांबळे (30 , रा. गोरेगाव मुंबई)
प्रकाश नाहर (65 रा. गोरेगाव मुंबई)
अर्णव झुंजारे (15 रा. नेरुळ नवी मुंबई)
किशन चौधरी , गंभीर जखमी
काळूराम जाट , गंभीर जखमी




























































