
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. घाटातील प्रवासाचा वेळ आणि इंधनाची मोठय़ा प्रमाणावर नासाडी होत आहे. यावर मात करण्यासाठी ‘मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने प्रगतीपथावर असून पुढील वर्षीच्या मे महिन्यात ही ‘मिसिंग लिंक’ वाहतुकीसाठी खुली करण्याची योजना आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएमआरडीए) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘मिसिंग लिंक’चा प्रकल्प आखल्यामुळे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे.
यासाठी मुसळधार पावसामध्ये दरीमध्ये पूल उभारणे मोठे आव्हान होते. जून-जुलैमध्ये सुरू झालेला पाऊस यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होता. पावसाचा मारा कमी झाल्यावर आता पुन्हा काम सुरू झाले आहे.
मिसिंग लिंक काय आहे?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिटय़ूट (कुसगाव) हे सुमारे 19 किमीचे अंतर आहे. यादरम्यानचे अंतर कमी होणार आहे. या एक्स्प्रेस वेवरच्या घाटामधील 13.3 किमीचे अंतर कमी करण्यासाठी या मार्गावर 1.68 किमी आणि 8.87 किलोमीटरचे दोन बोगदे तयार करण्यात आले आहे तसेच दरीमध्ये 181 मीटर उंचीचा पूल उभारण्यात येत आहे. या देशातील सर्वातील उंचीचा पूल असल्याचे सांगण्यात येते. या पुलाचा एक भाग तयार झाला आहे. उर्वरित पुलाचा दुसरा मार्ग जोडण्याचे आणि केबल जोडणीचे काम सुरू आहे. जोडणीचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे.
120 किमी वेग मर्यादा
महामार्गावरील घाटाचा रस्ता चढताना अवजड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागतात, पण मिसिंग लिंक सुरू झाल्यावर घाटाचा रस्ता टाळता येणार आहे. हा 13.3 किमी लांबीच्या बोगद्यामुळे वेगवान वाहतूक होईल. कारण मिसिंग लिंकवर ताशी 120 किमी अशी वेगमर्यादा आहे. मिलिंग लिंक आठ लेनची तयार करण्यात आली आहे.



























































