मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ठप्प, 30 किमीच्या रांगा, 24 तासांची घालमेल… रखडपट्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी सहा वाजता अत्यंत ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने या मार्गावर न भूतो अशी तब्बल 24 तास महाभीषण कोंडी झाली. वायुगळतीच्या भीतीने दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. मुंबईकडे जाणारी वाहतूक ताम्हिणी घाट, माळशेज घाटमार्गे वळवण्यात आली आणि प्रचंड गोंधळ उडाला. तब्बल 20 ते 25 किलोमीटरच्या रांगा लागल्या. गाड्या एकाच जागी थांबून राहिल्याने त्यात प्रवाशी रात्रभर अडकून पडले. महिला, बालके, रुग्ण आणि वृद्धांचे प्रचंड हाल झाले. खाण्याचे पदार्थ संपल्याने ते तहान, भुकेने हवालदिल झाले. शौचालयेही नसल्याने प्रचंड कुचंबणा झाली. संपूर्ण खोपोली शहर आणि आसपासचे घाट व रस्त्यांवर पहावे तिथे वाहने खोळंबली. अखेर आज सायंकाळी सहा वाजता गॅस गळती थांबवण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश आले आणि तब्बल 24 तासांनी एक्सप्रेस वेची वाहतूक कोंडी फुटली.

मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रोपलेन हा ज्वलनशील गॅस घेऊन महाकाय कंटेनर मंगळवारी निघाला. आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि हा कंटेनर भर रस्त्यात आडवा झाला. अत्यंत घातक आणि ज्वलनशील गॅस या कंटेनरमध्ये असल्याने प्रशासनाने SOSचा कॉल दिला. त्यामुळे अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूकडील वाहतूक रोखून धरली. त्यात पुणे-मुंबईची बाजू पूर्णपणे ‘ब्लॉक’ करण्यात आली. त्यातच मुंबईकडे जाणारी वाहने पुण्याकडील रस्त्यावर उलटय़ा दिशेने घुसली. त्यामुळे एक्सप्रेस वे संपूर्णपणे ठप्प झाला. अनेक वाहने जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर शिरल्याने वाहतुकीचा पुरता जांगडगुत्ता झाला. ही वाहतूक खोपोली गावातून वळवण्यात आल्याने खोपोली शहर, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीचा अक्षरशः चक्रव्यूह झाला. त्यात जागोजागी प्रवाशी अडकून पडले.

एनडीआरएफच्या टीमला ‘कॉल’

टँकरमधील गॅस गळती सुरू होताच एनडीआरएफच्या टीमला तत्काळ पाचारण करण्यात आले. त्यांनी गॅस गळती रोखण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. उरण येथील ओएनजीसीचे तज्ञ पथकही वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. अथक प्रयत्नांनंतर आज दुपारनंतर ही गॅस गळती रोखण्यात या पथकांना यश आले. त्यानंतर हा टँकर बाजूला केल्यावर सायंकाळी 6 वाजता वाहतूक सुरू करण्यात आली. खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल पाटील, खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, बोरघाट पोलीस निरीक्षक पाटील यांनी गळती रोखण्यासाठी तातडीचे प्रयत्न केले.

एसटीच्या तब्बल 139 बसफेऱ्या रद्द

वाहतूक कोंडीचा मोठा परिणाम एसटी महामंडळाच्या बससेवेवर झाला. दोन दिवसांत एसटीच्या विविध विभागांतील तब्बल 139 बसफेऱया रद्द करण्यात आल्या. वाहतूक कोंडीमध्ये 163 बसगाडय़ांची कित्येक तास रखडपट्टी झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल आणि महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. सातारा विभागातील 46, सोलापूर- 36, पुणे-20, सांगली- 18, कोल्हापूर-13, पालघर-12 तसेच ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 गाडय़ांची वाहतूक कोंडीमध्ये रखडपट्टी झाली.

ताम्हिणी, माळशेज दोन्ही घाट ब्लॉक

मुंबई-पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे, पौड, ताम्हिणी घाट मार्गे माणगावहून मुंबईकडे वळवण्यात आली. तर पुणे, चाकण, नारायणगाव, माळशेज घाट मार्गे कल्याण, ठाण्याकडे वळवण्यात आली. एकाच वेळी हजारो वाहने या दोन्ही अरुंद घाटांमध्ये आल्याने हे दोन्ही घाट ‘ब्लॉक’ झाले.

ट्रक चालकांचे रस्त्यावरच किचन

ट्रक व टँकर चालकांनी त्यांचे किचन रस्त्यावरच थाटले. रस्त्यावरच स्टोव्ह पेटवून त्यांनी सब्जी व रोटय़ा बनवल्या. स्वतःचे उदरभरण करतानाच त्यांनी जमेल तसे जेवण इतर गाडय़ांमध्ये अडकलेल्या प्रवाशांनाही देत माणुसकीचा प्रत्यय दिला.