
दिवाळीच्या सुट्टय़ा आणि त्याला लागून आलेला वीकेंड यामुळे मुंबई, ठाणेकर कुटुंबकबिल्यासह दिवाळी सुट्टीवर निघाले आणि शनिवारी मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर तुफान वाहतूककोंडी झाली. अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिटदरम्यान तब्बल आठ किलोमीटरच्या रांगा लागल्या. या मार्गावरील वाहतूक अक्षरशः मुंगीच्या पावलाने सुरू होती. आधीच ऑक्टोबर हीटचे चटके, त्यात वाहतुकीचा जांगडगुत्ता त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवलीकर दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी मोठय़ा संख्येने आपल्या मूळ गावी जातात. काही जण देवदर्शन तर अनेक जण लोणावळय़ासह अनेक पर्यटनस्थळांकडे आपला मोर्चा वळवतात. यंदा दिवाळीच्या सुट्टीला शनिवार आणि रविवारच्या सुट्टय़ा आल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघरमधून हजारो रहिवासी त्यांच्या कुटुंबकबिल्यासह खासगी गाडय़ांनी निघाले. त्यामुळे रात्रीपासूनच मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर गाडय़ांचा वेग मंदावला. आज सकाळी त्यात हजारो गाडय़ांची आणखी भर पडली. पर्यायाने या महामार्गावर तुफान वाहतूककोंडी झाली. पहाटे पाच पासूनच घाटामध्ये एक्प्रेस वे पॅक झाला.
जुना मार्गही ब्लॉक
मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर वाहतूककाsंडी झाल्यानंतर अनेक वाहन चालकांनी आपली वाहने खोपोलीतून जुन्या मार्गाने वळवली. त्यामुळे दस्तुरी आणि अंडा पॉईंटजवळ मोठी वाहतूककोंडी झाली. जुना मार्गही वाहतूककोंडीने ब्लॉक झाला. वाहतुकीचा जांगडगुत्ता सोडताना पोलिसांच्या नाकीनऊ आले.