
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे सुमारे 97.7 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या मे महिन्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. तांत्रिक आणि भौगोलिक अडचणीमुळे या प्रकल्पाच्या कामाच्या मुदतीत वाढ झाल्याचेदेखील त्यांनी कबूल केले. मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत आमदार सतेज पाटील, भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.





























































