मुंबईत 24 तासांत मध्यम सरी कोसळतील, कुलाबा वेधशाळेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत गेल्या तीन दिवसांत चांगला पाऊस सुरू असून आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. येत्या 24 तासांतही आकाश दिवसभर ढगाळ राहील आणि मध्यम सरी कोसळतील, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

मुंबईत आज दुपारचे काही तास सोडले तर दिवसभर पावसांची संततधार सुरू होती. मात्र रस्ते, बस आणि लोकल वाहतूक नियमित वेळेत सुरू होती. दिवसभरात 9 ठिकाणी झाडाच्या फांद्या आणि झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. यात शहरात 2, पूर्व उपनगरात 2 तर पश्चिम उपनगरात 5 झाडे कोसळली. दिवसभरात 4 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. दरम्यान, मुंबईत एक तर पूर्व उपनगरात एक अशा दोन ठिकाणी भिंती आणि घर कोसळण्याच्या घटना घडल्या. मात्र सुदैवाने या सर्व दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.

गोवंडीत रुग्णालयाचे छत कोसळले, एक जखमी 

गोवंडी येथील कुरेशी मोहल्ला, टाटा नगर, स्टेशन रोड, गोवंडी (प.) येथील असलेल्या पाटील या खासगी रुग्णालयाच्या तळमजला अधिक एक मजली इमारतीच्या छताचा काही भाग रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत मोहनलाल शर्मा (55) हे जखमी झाले. त्यांना श्री सिद्धी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारांनंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक पाल यांनी सांगितले.