सामूहिक बलात्कार, हत्येसारख्या गंभीर गुह्यांतील वॉण्टेड आरोपी गजाआड

494

महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये हत्या, सामूहिक बलात्कार, दरोडा, हत्येचा प्रयत्न यासारख्या अनेक गंभीर गुन्हे करणारा आणि गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत लपून राहणारा वॉण्टेड आरोपी अखेर कांदिवलीत सापडला. गुन्हे शाखेच्या युनीट-12 च्या पथकाने त्या वॉण्टेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

अरूमुगम राजा जोथीमानी देवेंद्र उर्फ पुंदुमनी राजा (33) असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे. मीरा रोड येथे एका हवाला व्यावसायिकाची हत्या करून त्याच्याकडील मुद्देमाल चोरण्याबरोबर आरे येथे एका इसमावर चाकूचे वार करून त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर अरुमुगम याने मुंबई सोडली होती. त्याने थेट तामीळनाडूतील आपले गाव गाठले. पण तेथे जाऊनही तो शांत बसला नाही. तेथे हत्येचा गुन्हा केल्यानंतर अरुमुगम पुन्हा मुंबईत आला होता. येथे आल्यानंतर तो ओळख बदलून राहत होता. याबाबत युनिट-12 ला माहिती मिळाली. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण, प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन गवस, अतुल डहाके, एपीआय विक्रमसिंह कदम, अतुल आव्हाड, उपनिरीक्षक हरेष पोळ व पथकाने कांदिवली पूर्वेकडील अशोक नगरात सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार अरुमुगम अशोक नगरातील उड्डाणपुलाखाली येताच पोलीस पथकाने त्याच्यावर झडप मारली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता 2014 मध्ये आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामूहिक बलात्कार व दरोडा तसेच काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येसह दरोडा तसेच तामीळनाडूतील राजापालायम येथे केलेल्या हत्येच्या गुह्याची कबुली दिली. अरूमुरगमविरोधात हत्येचा प्रयत्न, सामुहिक बलात्कार, खंडणी, अपहरण आदी गंभीर गुह्यांची नोंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या