गणपती विसर्जनासाठी पोलीस, पालिका सज्ज

420

दहा दिवसांच्या मुक्कामानंतर सर्वांचे लाडके दैवत गणपती अखेर गुरुवारी स्वगृही परतणार आहेत. मोठ्या भक्तिभावात गणरायांचे विसर्जन विविध ठिकाणच्या चौपाट्यांवर करण्यात येईल. हा विसर्जन सोहळा सुरळीत व कोणत्याही विघ्नाविना पार पडावा यासाठी पालिका व पोलीस दल सज्ज झाले आहे. पालिका व पोलिसांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. शहरातील महत्त्वाच्या चौपाट्या व मिरवणुकीच्या मार्गांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये याचीदेखील दक्षता घेतली आहे.

गुरुवारी अनंत चतुर्दशी असल्याने दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात आले आहेत. शिवाय विसर्जन मिरवणुकींना अडथळा होऊ नये याकरिता अवजड वाहनांना मुंबईत नो एण्ट्री केली असून शहरात केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांनी सर्व तयारी केली आहे.

वाहतुकीचे नियमन करण्यासाठी 3002 पोलीस अधिकारी व अंमलदार, 1570 ट्रॅफिक वॉर्डन्स तैनात असतील. शिवाय पोलिसांच्या मदतीसाठी अनिरुद्ध अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, आरएसपी शिक्षक, नागरी संरक्षण दल, वॉटर सेफ्टी पेट्रोल, एनएसएस विद्यार्थी, स्काऊट-गाइडस् आदी वेगवेगळया स्वयंसेवी संघटना असणार आहेत.

53 रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील, 56 रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आलेत, 18 रस्ते मालवाहू वाहनांना प्रवेश बंद आहेत, 99 ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आली आहेत. गिरगाव, शिवाजी पार्क, जुहू, पवई या विसर्जन ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळते. यावेळी महिला आणि बालकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, मदतीची आवश्यकता असल्यास पोलिसांशी 100 नंबरवर संपर्क साधा.

गणेशमूर्ती विसर्जन करताना ही काळजी घ्या

  • खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नका.
  • भरती-ओहोटीच्या वेळांची माहिती समुद्रकिनाऱ्यांवर लावण्यात आली आहे ती समजून घ्या.
  • विसर्जनासाठी पालिकेच्या प्रशिक्षित जीवरक्षकांची मदत घ्या.
  • महापालिकेने पोहण्यासाठी निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नका.
  • नाकातोंडात पाणी गेल्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घ्या.
  • अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका.
  • लहान मुलांची विशेष काळजी घ्या.
  • गणेशभक्तांनी पाण्यात गमबूट वापरावेत.
  • मत्स्यदंश झाल्यास घाबरून न जाता महापालिकेच्या प्रथमोपचार केंद्रात जाऊन तत्काळ उपचार घ्या.

भरती               लाटांची उंची      ओहोटी       लाटांची उंची
सकाळी 11.20   4 मीटर        पहाटे 4.38    1.08 मीटर
रात्री 11.25     3.70 मीटर     पहाटे 5.12     0.99 मीटर

आज मुसळधार पाऊस
उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई ते गुजरातपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पाऊस आणि भरतीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांनी विसर्जनादरम्यान विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिका आणि हवामान विभागाने केला आहे.

…तर मंडळ जबाबदार राहणार
मध्य रेल्वेने सुरक्षा तपासणी करून मुंबई शहरातील धोकादायक झालेल्या भायखळा, आर्थर रोड (चिंचपोकळी स्टेशनवरील), करी रोड रेल्वे पूल व जुहूतारा पुलावर एका वेळी 16 टनांपेक्षा जास्त वजनाची रहदारी होता कामा नये असे सांगितले आहे. त्यामुळे मिरवणुकीवेळी संबंधित गणेशोत्सव मंडळ व नागरिकांनी त्याची खबरदारी घ्यावी. सदर पुलांवर एकाच वेळी 16 टनांपेक्षा जास्त वजन होऊन अपघात अथवा दुर्घटना झाल्यास त्याला संबंधित मंडळ जबाबदार राहील, असा इशारादेखील पोलिसांनी दिला आहे.

बाप्पांसाठी 896 लोखंडी प्लेट
मुंबईत एवूâण 11 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यातील अनेक गणेशमूर्ती भव्य आहेत. त्यांचे विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी पालिकेने 896 लोखंडी प्लेट सज्ज ठेवल्या आहेत. विविध गणेश मंडळांच्या विनंतीनंतर ही तयारी करण्यात आली आहे.

निर्माल्याची ताबडतोब विल्हेवाट
निर्माल्याची ताबडतोब विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कलशातील निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर आणि डंपर अशी एकूण 267 वाहने सर्व विसर्जन स्थळांवर सज्ज ठेवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या