प्रजासत्ताक दिनापासून मुंबईत नाइट लाइफ! पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले जाहीर

1119

मुंबईत 26 जानेवारीपासून नाइट लाइफ सुरू होणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. नरिमन पॉइंट, काळा घोडा आणि ‘बीकेसी’सह मॉल, हॉटेल आणि अनिवासी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू होणार आहे. नाइट लाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या आणि रात्रंदिवस धावणाऱया मुंबईत नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा रात्रीदेखील मिळाव्यात यासाठी ‘नाइट लाइफ’ची संकल्पना आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. याला सर्वपक्षीयांचा पाठिंबा मिळाल्यामुळे 2017 मध्ये याबाबत सरकारने अध्यादेश काढून निर्णयही घेतला आहे. मात्र याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांची निर्णायक बैठक घेतली आहे. यानुसार येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू होणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची कचरामुक्त मुंबईची संकल्पना प्रत्यक्षात येणार

मुंबई कचरामुक्त करण्यासाठी 26 जानेवारीपासून अभियान सुरू करणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

उद्योग-रोजगार वाढणार

या उपक्रमात 7 दिवस 24 तास मुंबईकरांना सेवासुविधा मिळणार असल्याने उद्योग-रोजगार वाढणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवाय रात्रीदेखील कामानिमित्त घराबाहेर असणाऱया मुंबईकरांना सोयीसुविधा मिळणार असल्याने हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अनिवासी क्षेत्रात सुरू होणाऱया या उपक्रमामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले. मुंबईआधी अहमदाबाद शहरात नाइट लाइफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱयांना मुंबई शहर मागे राहावं असं वाटतंय का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

आपली प्रतिक्रिया द्या