तुम्ही दाखवलेला खड्डा भरला का? खड्डय़ाच्या तक्रारदारांना पालिकेचा कॉल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘खड्डेमुक्त मुंबई’साठी पालिकेने 1 नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या ‘खड्डा दाखवा आणि 500 रुपये कमवा’ योजनेत पहिल्या सहा दिवसांत 1670 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील 91 टक्के तक्रारींवर कार्यवाही करून खड्डे बुजवण्यात आले असून शिल्लक कामही वेगाने करण्यात येत आहे. दरम्यान, झालेल्या कामाची खात्री करण्यासाठी पालिका सर्व तक्रारदारांना फोन करून झालेल्या कामाची  खात्री करणार आहे.

पालिकेने मुंबईत 1 नोव्हेंबरपासून ‘रस्त्यावर खड्डा दाखवा 500 रुपये मिळवा’ असा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यात पालिकेच्या ऍपवर तक्रार नोंदवल्यानंतर 24 तासांत खड्डा बुजवला गेला नाही तर तक्रारदाराला 500 रुपये देणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे कंत्राटदार-अधिकाऱ्यांकडून रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, टिकावू-मजबूत रस्ते बनावेत यासाठी खड्डा बुजवला नाही तर खड्डय़ाच्या तक्रारदारांना देण्यात येणारे 500 रुपये संबंधित वॉर्ड अधिकारी आणि कंत्राटदाराच्या खिशातून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. असे असले तरी प्रशासन तक्रारदारांना किती आणि कशा प्रकारे पैसे देणार हे स्पष्ट करावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. मात्र यावर प्रशासनाकडून फक्त कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

खड्डय़ांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून प्रशासन रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असल्याचा आरोप केला. या वेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी इतका महत्त्वाचा निर्णय घेताना स्थायी समिती, नगरसेवकांना विश्वासात का घेतले नाही, असा सवाल केला. तर भाजपच्या प्रभाकर शिंदे यांनी मुद्दा उपस्थित केलेल्या सर्व सदस्यांच्या वक्तव्याचा इतिवृत्तात उल्लेख न करता अपूर्ण उत्तर का देता, असा प्रश्न उपस्थित केला.

ट्रफिकमधील चार अधिकारीही नेमणार

नागरिकांना खड्डय़ांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्र. 1800221293, पालिका तक्रार निवारण क्र. 1916, ‘माय बीएमसी 24-7’, ‘माय बीएमसीपॉटहोल फिक्सइट’, पालिकेचे पोर्टल, व्हॉट्सऍप क्रमांक आणि सोशल मीडिया अशा सुविधा उपलब्ध करून दिल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. या ठिकाणी आलेल्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. तर  ‘माय बीएमसी पॉट होल फिक्स इट’वर आलेल्या 1670 तक्रारींवर झालेल्या कामांची खातरजमा करण्यासाठी पालिकेच्या ट्रफिक विभागातील चार अधिकारी नेमणार असल्याची माहितीही पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

कोल्डमिक्सचा फैसला 18 तारखेला

भर पावसातही खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने कोल्डमिक्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र हे कोल्डमिक्स सफशेल अपयशी ठरल्याचे सांगत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. सुरुवातीला ऑस्ट्रिया, इस्रायलमधून आणले जाणारे 125 रुपये प्रतिकिलो कोल्डमिक्स पालिका 28 रुपयांत तयार करीत आहे. मात्र उत्पादन खर्चात असणारी तफावत पाहता पालिका तयार करीत असलेले कोल्डमिक्स दर्जेदार नसल्याचा आरोप सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी केला. तर कोल्डमिक्स फेल झाल्याचे सर्व नगरसेवक सांगत असताना पालिका प्रशासन कोल्डमिक्सचा अट्टहास कुणाच्या फायद्यासाठी करीत आहे, असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. या वेळी कोल्डमिक्सबाबत 18 नोव्हेंबर रोजी आआयटी, स्टॅक कमिटी आणि पालिका प्रशासनाची बैठक घेऊन पुनर्विचार करणार असल्याची माहिती मुख्य रस्ते अभियंता संजय दराडे यांनी दिली.