
राज्यावर आलेले कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्ती या काळात शिवसेना जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. शिवसेनेने जनतेला जी साथ दिली त्यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. हे यश मिळाल्यानंतर ते कायम राखण्यासाठी जनतेच्या कामांवर अधिक भर द्या. आगामी नगर पंचायत, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा डौलाने फडकायला हवा. यासाठी जनतेपर्यंत पोहोचा, प्रत्येक गावागावात, घराघरात शिवसेना पोहोचायला हवी यासाठी कामाला लागा. शिव संपर्क अभियान गावागावात राबवा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिव संपर्प अभियान प्रभावीपणे राबविण्याचे आदेश दिले. 24 ते 27 फेब्रुवारीदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान शिवसेना पदाधिकाऱयांनी गावागावात शिवसेनेची संघटनात्मक बांधणीवर अधिक भर द्यावा. कोरोनाचे निर्बंध पाळूनच हे अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
शिवसेनेने केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवा
संपर्अकभियानाच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱयांनी 36 जिह्यांतील शिवसेनेची बुथबांधणी किती झाली याची खातरजमा करावी. जनतेपर्यंत पोहोचून शिवसेनेने केलेल्या विकासकामांची त्यांना माहिती द्यावी. त्याचप्रमाणे त्यांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्यावे, असे शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितल्याचे अनिल देसाई म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल देणार
- या बैठकीदरम्यान शिवसेनेची लोकसभा, विधानसभा विभागनिहाय तसेच जिल्हानिहाय पक्षबांधणीचा आढावा घेण्यात आला.
- नवीन मतदारांचे नोंदणी अभियान, शिवसेना सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे. त्याचप्रमाणे गावागावात झालेले प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प तसेच रखडलेले प्रकल्प यांची गटप्रमुखांच्या माध्यमातून माहिती घ्यावी.
- मतदारांना नेमके काय हवे आहे, त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचत आहेत की नाही याचा एक अहवाल तयार करावा
आणि तो अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले. - या बैठकीला शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, पक्षप्रतोद सुनील प्रभू आदी उपस्थित होते.
































































