महिलांमध्ये वाढतेय शरीरसौष्ठवाची क्रेझ, ‘मुंबई श्री’च्या मंचावर अवतरणार पीळदार सौंदर्य

943

महिला म्हटली की तिला क्षणोक्षणी तडजोड करावीच लागते. कधी शिक्षणासाठी तर कधी कुटुंबासाठी… लग्न झालं की नवऱ्यासाठी आणि मुल झालं की त्याच्यासाठी… स्वत:च्या करिअरकडे, आवडीनिवडींकडे त्यांना मनापासून कधी लक्षच देता येत नाही. पण आपल्या सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर केवळ स्वत:च्या पॅशनसाठी ‘स्पार्टन मुंबई श्री’च्या मंचावर पीळदार सौंदर्य अवतरणार आहे. येत्या 29 फेब्रुवारीला अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबमध्ये रंगणाऱ्या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळणार आहे. सध्या महिलांमध्येही फिटनेस आणि शरीरसौष्ठवाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत असून मिस मुंबई जेतेपदासाठी फिटनेस फिजीक आणि शरीरसौष्ठव या दोन गटांत चुरशीची लढत होणार असल्यामुळे या स्पर्धेबाबतही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

शरीरसौष्ठवात सर्वाधिक मानाची आणि प्रतिष्ठेच्या असलेल्या स्पार्टन ‘मुंबई श्री’ स्पर्धेत महिलांच्या गटानेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. फिटनेस फिजीक आणि शरीरसौष्ठव या दोन्ही गटात पाचपेक्षा अधिक खेळाडूंची नोंद झाल्यामुळे स्पर्धा रंगतदार होणार, यात वाद नाही. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेने या स्पर्धेसाठीही जोरदार तयारी केली आहे. या स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा आणि फिटनेसबाबत जागरूकता निर्माण व्हावी, म्हणून वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे चीज ‘स्पार्टन मुंबई श्री’मध्ये होणार असल्याची भावना संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी बोलून दाखवली. अनेक महिला आपल्या पीळदार सौष्ठवाचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. महिलांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून स्पर्धेच्या दिवशी थेट स्पर्धेला येणाऱया खेळाडूंचा आकडा महिला फिटनेस क्षेत्राला स्फूर्ती देणारा असेल, असा विश्वास सरचिटणीस राजेश सावंत यांनी व्यक्त केला.

दोन वर्षांपूर्वी महिलांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे रद्द करावी लागणारी मिस मुंबई यावेळी दणक्यात होतेय. गतविजेती मंजिरी भावसार, दिपाली ओगले,रेणूका मुदलियार, निशरीन पारिख, डोलान आचार्य असं पीळदार सौंदर्य फिटनेस फिजीक प्रकारात धमाका करतील तर शरीरसौष्ठव स्पर्धेत अमला ब्रम्हचारी, श्रद्धा डोके, माया राठोड अशा खेळाडू ‘कुछ कर दिखाना है’ म्हणत उतरणार आहेत. स्पर्धेत उतरणाऱ्या बहुतांश खेळाडू या केवळ आपल्या पॅशनसाठी खेळणार आहेत. ऐन उमेदीच्या काळात विविध कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना आपल्या आवडींसाठी वेळ देता आला नव्हता, पण आता सारं काही बाजूला सारून त्या बिकीनीत उतरून आपल्या फिटनेसचे अनोखे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या