‘मुंबई श्री’ चे पीळदार युद्ध 9 मार्चला

मुंबईचे शेकडो शरीरसौष्ठवपटू वर्षभर ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात ती शरीरसौष्ठवाची श्रीमंती आणि पीळदार ग्लॅमर असलेली स्पार्टन न्यूट्रिशन ‘मुंबई श्री’ येत्या 9 मार्चला अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात रंगणार आहे. मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या या स्पर्धेचे यंदाही न भूतो न भविष्यती असेच दिमाखदार आयोजन करण्यासाठी शरीरसौष्ठव संघटनेने कंबर कसली आहे. मुंबईकर शरीरसौष्ठवपटूसाठी शरीरसौष्ठव खेळातील ऑस्कर असलेल्या या स्पर्धेचे यंदाही दिमाखदार आयोजन केले जाणार असल्याची ग्वाही बृहन्मुंबई आणि उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि किट्टी फणसेका यांनी दिली.

सुमारे दहा लाखांच्या बक्षीसांचा वर्षाव

शरीरसौष्ठवपटूंना श्रीमंत करणार्‍या या स्पर्धेत लौकिकानूसार किमान 200 खेळाडू सहभाग घेतील, असा प्राथमिक अंदाज असला तरी खेळाडूंचा प्रतिसाद पाहता हा आकडाही ओलांडला जाऊ शकतो. उमेश गुप्ता, उबेद पटेल, संतोष भरणकर, उमेश पांचाळ, अक्षय खोत, विशाल गिजे, विशाल धावडे, अभिषेक लोंढे, संकेत भरम, प्रणव खातू, अमेय नेवगे, अमित साटम, विलास घडवले सारखे खेळाडू आपले मुंबई श्रीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतील. गतवर्षी विजेत्याला सव्वा लाखांचे इनाम दिले गेले होते, तर यंदा त्यात 25 हजारांची वाढ करत ते दीड लाखाचे करण्यात आले आहे. तसेच द्वितीय आणि तृतीय विजेत्याला अनुक्रमे 75 आणि  50 हजार रुपयांचे रोख इनाम दिले जाणार आहेत. ही स्पर्धा एकंदर आठ गटात होणार असून गटातील अव्वल पाच खेळाडूंना 15,12,10,8,5  हजार असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

फिटनेस फिजीक खेळाडूंनाही मुंबई श्रीचे वेध

फिटनेसची क्रेझ अवघ्या मुंबापुरीत आहे. त्यामुळे सध्याची युवा पिढी मोठ्या संख्येने फिटनेस फिजीक प्रकाराकडे वळली आहे. या स्पर्धेत केवळ दोनच गट असले तरी या दोन गटात शंभरपेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. या गटातही खेळाडूंवर रोख बक्षीसांचा वर्षाव केला जाणार आहे, अशी माहिती सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली.