
मुंबई शहर आणि पूर्व उपनगराला जोडणाऱया शीव उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून गर्डर बसविण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही गर्डर बसविण्याचे काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून पुलाची सर्व कामे 15 जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे नियोजन आहे. 15 ऑगस्टपासून हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
शीव रेल्वे स्थानकावरील रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेल्वे प्रशासनाने पालिकेकडे सोपवले. हा जुना पूल मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमधून जातो. त्यामुळे पुलाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने दिला होता. पुलाच्या पुनर्बांधणीचा खर्च मध्य रेल्वेमार्फत दिला जाणार आहे. मात्र, पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम महापालिकेकडे सोपवण्यात आले आहे. विविध कारणांमुळे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम रेंगाळले होते. यावर वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांनी आवाज उठवल्यानंतर पालिकेने पुलाच्या कामाला गती दिली.
पुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामात अडथळे आल्यामुळे मूळ बांधकाम पद्धतीत बदल केला गेला. त्यामुळे प्रकल्प खर्चात सात कोटींची मोठी वाढ होऊन एकूण खर्च 49 कोटी 96 लाखांवर गेला आहे. तथापि, बांधकाम पद्धतीत बदल केल्याने पुलाच्या कामाने वेग घेतला.
पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गेल्याच महिन्यात या पुलाच्या कामाचा आढावा घेत 15 जुलैपर्यंत पुलाची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले होते.

























































