90 टक्केवाले वाढल्याने अ‍ॅडमिशन टाईट! अकरावी प्रवेशांचा कटऑफ वाढणार, मुंबईचा निकालही 2 टक्क्यांनी वाढला

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा राज्याचा एकूण निकाल यंदा घसरलेला असला तरी मुंबई विभागाचा निकाल साधारण दोन टक्क्यांनी वाढला आहे. मुंबईतून 90 टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण साडेचार हजाराने वाढली आहे. त्यामुळे यंदा नामांकित कॉलेजांचा अकरावीचा कटऑफ वाढून प्रवेशाकरिता तगडय़ा स्पर्धेला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबई विभागाचा निकाल यंदा 94.84 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या 93.87 टक्के निकालापेक्षा त्यात साधारण दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याच्या इतर विभागांच्या तुलनेत मुंबई तिसऱया क्रमांकावर असली तरी निकाल चांगला लागल्याने प्रवेशाकरिता स्पर्धा असेल. त्यात सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची 90 टक्के मिळविणाऱया विद्यार्थ्यांची वाढती पाहता अकरावी प्रवेशाचे गणित सोडवणे कठीण होणार आहे.

यंदा मुंबईतून नियमित 3,35,509 (गेल्या वर्षी 3,39,269) विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 3,21,566 (गेल्या वर्षी 3,25,143) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे 96.88 टक्के आणि मुलांची 94.85 टक्के आहे.

आठ विद्यार्थ्यांना 100 टक्के

मुंबईतील आठ विद्यार्थ्यांना 100 टक्के मिळाले आहेत. तर मुंबई विभागातून उत्तीर्ण झालेल्या 3.21 लाख विद्यार्थ्यांपैकी सुमारे 5.31 टक्के म्हणजे 17,895 विद्यार्थ्यांना 90 टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी हे प्रमाण चार टक्के होते. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या साडेचार हजाराने वाढली आहे. साधारण सात टक्के विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्क्यांच्या दरम्यान गुण मिळाले आहेत. तर 80 ते 85 टक्के मिळविणाऱयांची टक्केवारी आहे, 8.7 टक्के.

गेल्या वर्षीच्या तुलनेत टक्केवारीनिहाय निकाल

टक्केवारी – 2024 – 2025

90 आणि त्याहून अधिक – 13,430 – 17,895
85 ते 90 – 21,541 – 23,460
80 ते 85 – 28,819 – 29,325
75 ते 80 – 33,976 – 32,913
70 ते 75 – 37,557 – 34,919
65 ते 70 – 39,417 – 35,746
60 ते 65 – 43,605 – 40,144
45 ते 60 – 88,803 – 89,157
45 पेक्षा कमी – 32,290 – 32,958

मुंबईतील 90 टक्केवाले

2025 – 17,895
2024 – 13,430
2023 – 11,785
2022 – 10,764
2021 – 15,550

परीक्षेला बसलेल्या मुली

एकूण – 1,70,931 उत्तीर्ण – 1,63,468
परीक्षेला बसलेले मुलगे
एकूण – 1,86,989 उत्तीर्ण – 1,73,049

मुंबईची विभागनिहाय टक्केवारी

विभाग – 2023 – 2024 – 2025
ठाणे – 93.63 – 95.56 – 95.57
रायगड – 95.28 – 96.75 – 96.25
पालघर – 93.55 – 96.07 – 95.38
मुंबई शहर – 93.95 – 96.19 – 96.79
मुंबई उपनगर 1 – 93.55 – 96.10 – 96.94
मुंबई उपनगर 2 – 92.56 – 94.88 – 94.94

खासगी विद्यार्थ्यांचा निकाल 77.93 टक्के

मुंबईतून खासगीरीत्या बसलेल्या 16,572 विद्यार्थ्यांपैकी 12,913 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल 77.93 टक्के इतका आहे.

मुंबईतील 1,579 शाळा शंभर नंबरी

सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकालात शंभर नंबरी कामगिरी करणाऱया शाळांची संख्या मुंबईत यंदा 1,579 इतकी आहे. गेल्या वर्षीही साधारण दीड हजार शाळांचा निकाल 100 टक्के लागला होता. विशेष म्हणजे मुंबईतील एकाही शाळेचा निकाल शून्य टक्के लागलेला नाही. गेल्या वर्षी ही संख्या 5 होती.

मुंबईचा गेल्या काही वर्षांतील निकाल

2025 – 95.84 टक्के
2024 – 93.87 टक्के
2023 – 93.66 टक्के
2022 – 96.94 टक्के (परीक्षा सुरळीत मात्र कोविडमुळे अभ्यासक्रम कमी)
2021 – 99.95 टक्के (कोविडमुळे परीक्षा न झाल्याने सरासरी मूल्यांकनानुसार निकाल)
2020 – 95.30 (कोविड सुरू होण्याच्या आधी परीक्षा झाली होती)