आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी घेता येतील दोन पदव्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे. त्यातील एक अभ्यासक्रम ते नियमित महाविद्यालयांमध्ये जाऊन पूर्ण करू शकतील आणि दुसरा अभ्यासक्रम ऑनलाइन करता येईल किंवा मग महाविद्यालयांमध्ये सायंकाळची सत्रे चालवली जातील. विद्यापीठ अनुदान आयोगानेच (यूजीसी) हा निर्णय घेतला आहे.

सध्याच्या यूजीसीच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाबरोबर फक्त प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा अभ्यासक्रमाचेच शिक्षण घेता येते. दुसरा पदवी अभ्यासक्रम करता येत नाही. पण पुढील वर्षीपासून त्यांना एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी नियम बनवण्यास यूजीसीने तज्ञांची समिती स्थापन केली आहे.

नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण विद्यार्थी केंद्रित बनवण्यात येणार आहे. विद्यार्थी जर एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणार असतील तर त्याला प्रशासनाची काहीच हरकत नसावी असे यूजीसीचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी म्हटले आहे. 2012 मध्येच यूजीसीने त्यासाठी पावले उचलली होती, परंतु काही कारणास्तव त्यावर कार्यवाही झाली नाही. एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम सुरू केल्यास त्याचा भार प्रशासनावर पडणार होता.

यूजीसी अधिनियम 2018 ची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम सुरू करणे शक्य असल्याचे समजले. विद्यार्थी एक पदवी अभ्यासक्रम नियमित महाविद्यालयात करू शकतात आणि दुसरा पदवी अभ्यासक्रम ऑनलाइन करू शकतात. विद्यार्थी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्येही पदवीचे शिक्षण घेऊ शकतात. सप्टेंबर 2019 पर्यंत यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.