हिंदू देवदेवतांच्या अपमानाविरुद्ध प्रक्षोभ; देशभरात तांडव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी ‘तांडव’ वेबसिरीज वादाच्या भोवऱयात सापडली असून दिवसेंदिवस हा वाद वाढत चालला आहे. देशभरात या वेबसिरीजविरोधात आक्रमक भूमिका घेत तक्रारी दाखल केल्या जात आहेत. या प्रकरणी अॅमेझॉन प्राइमच्या प्रमुखांसह निर्माते-दिग्दर्शक, लेखकांवर गुन्हा दाखल केल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलीस चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.

‘तांडव’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी वेबसिरीजविरोधातील वाढता तणाव लक्षात घेत जाहीर माफी मागितली होती. मात्र, तरीही हा वाद काही थांबण्याचे चिन्ह नाहीत. ‘तांडव’विरोधात अनेक महाराष्ट्रासह अनेक राज्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी निर्माता व दिग्दर्शकांची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस मुंबईत दाखल झाल्याने ‘तांडव’च्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य मिळतंय, अद्याप कुणाचीही चौकशी झालेली नसल्याच उत्तर प्रदेशचे पोलिस अधिकारी अनिल सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान भाजपकडून संबंधितांवर कारवाईसाठी दबाव वाढू लागला आहे.

घाटकोपर येथेही गुन्हा दाखल

‘तांडव’ ही वेबसिरीज दोन जातींमध्ये द्वेष निर्माण करणारी तसेच हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणारी व बदनामी करणारी असल्याचा आक्षेप घेत त्याविरोधात झालेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलीस ठाण्यात वादग्रस्त ठरलेल्या तांडव वेबसिरीजशी संबंधित कलावंत व निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तांडव वेबसिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशू मेहरा, लेखक गौरव सोलंकी, अभिनेता सैफ अली खान, तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचे इंडिया हेड पैन्टेटन्ट अपर्णा पुरोहित व अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचे इंडिया हेड अमित अग्रवाल तसेच अन्य कलावंतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिग्दर्शक, निर्माता, लेखकाची हायकोर्टात धाव

अभिनेता सैफ अली खान याची मुख्य भूमिका असलेल्या अमेझॉन प्राइमवरील तांडव वेबसिरिजमध्ये हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आल्याच्या आरोपामुळे वेबसिरिजच्या दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि अमेझॉन प्राइमच्या पंटेंट हेडविरोधात उत्तर प्रदेश येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी लखनौ येथे दाखल करण्यात आलेल्या गुह्याप्रकरणी चौघांनी हायकोर्टात धाव घेतली असून न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी चौघांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने या चौघांना तीन आठवडय़ांसाठी अटकपूर्व ट्रांझिट जामीन अर्ज मंजूर केला आहे.

अमेझॉन प्राइमवर 15 जानेवारी रोजी दिग्दर्शक अली अब्बास जफर यांची तांडव वेबसिरिज प्रदर्शित करण्यात आली. या वेबसिरिजमध्ये हिंदू देवदेवतांबाबत आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला असून उत्तर प्रदेश येथे विविध ठिकाणी दिग्दर्शक अली जफर, निर्माता हिमांशू मेहरा, लेखक गौरव सोलंकी आणि अमेझॉन प्राइमच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लखनौ येथील स्थानिक न्यायालयात नियमित जामीन अर्ज करता यावा यासाठी या चौघांनी मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व ट्रांझिट जामिनासाठी अॅड. आबाद पोंडा यांच्यामार्फत अर्ज केला आहे. या अर्जावर आज न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने कोर्टाला सांगण्यात आले की, उत्तर प्रदेशमधून पोलीस आपल्या अशिलांना अटक करण्यासाठी आले असून आम्ही वेबसिरिजवरील आक्षेपार्ह दृश्ये काढून टाकली आहेत. त्यामुळे तीन महिन्यांसाठी ट्रांझिट जामीन देण्यात यावा. राज्य सरकारच्या वतीने अॅड. योगेश नखवा यांनी बाजू मांडली. हायकोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत याचिकाकर्त्यांना दिलासा दिला.

कायद्याप्रमाणं कारवाई केली जाईल!

‘तांडव’ या वेबसीरीजबाबत आमच्याकडे तक्रार आली असून त्यावर कायद्याप्रमाणं कारवाई केली जाईल. केंद्र सरकारनेही याबाबत पावलं उचलली पाहिजेत. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मसवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही. त्यामुळे केंद्र सरकारनं याबाबत कायदा आणावा, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

कायद्याला आपलं काम करू द्या!

याप्रकरणात कायद्याला आपलं काम करू द्यावं. तपासात राजकीय हस्तक्षेप नको. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढण्याचं काम सुरू आहे. राजकारणासाठी सरकारी तपास यंत्रणेच्या व्यवस्थेचं मातेर केलं, असं मत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केलं.